कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील कर्जत पेट्रोलपंपासमोरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून हा पूल वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे.
नेरळ – कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील कर्जत पेट्रोलपंपासमोरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून हा पूल वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. या धोकादायक पुलामुळे वाहनचालकांमध्ये अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार वाहनचालक करत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मागील अनेक वर्षापूर्वीचा कर्जत-मुरबाड राज्यमार्ग वाढत्या वाहनांच्या वर्दळीमुळे दिवसेंदिवस अरुंद ठरत आहे. याच मार्गावर कर्जतनजीक लाखरण येथे असलेल्या पुलाची योग्य देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून पुलाच्या काही खांबांनाही तडे गेले आहेत.
मुरबाड येथे औद्योगिक वसाहत असून या राज्यमार्गावर टोल नाका नसल्याने वाहनधारक याच मार्गाला जास्त पसंती देतात. म्हणून या पुलावरून कंटेनर, ट्रेलर आदींची अवजड वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. यामुळे या रस्त्यावर प्रचंड दाब पडत असल्याने पुलावरील रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा असुरक्षित पुलावरून वाहनचालकांना प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. तसेच काही अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. म्हणून संबंधित प्रशासनाने याची लवकरच दखल घेऊन हा रस्ता खड्डेमुक्त करावा आणि पुलाच्या कठडय़ाचीही दुरुस्तीही करावी, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.
‘कर्जत-मुरबाड रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्यावरील सर्व पुलांची बांधणी नव्याने करण्यात यावी, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सरकारकडे पाठवण्यात आला आहे.’ – गिरीश पारीख, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत