कर्जत-चौक रस्त्यावर भिलवले येथे पाझर तलावाच्या परिसरात शिवसेनाप्रमुखांचा फार्महाउस आता सुना झाला आहे.
नेरळ – कर्जत-चौक रस्त्यावर भिलवले येथे पाझर तलावाच्या परिसरात शिवसेनाप्रमुखांचा फार्महाउस आहे. साडेसहा एकरमधल्या पाच गुंठे क्षेत्रात हा फार्महाउस आहे. शिवसेनेची राज्यात सत्ता येईपर्यंत बाळासाहेबांचे या ठिकाणी नेहमीच येणे-जाणे होते. मात्र, सहा सप्टेंबर १९९६ नंतर हा बंगला ओस पडला आहे.
बाळासाहेब अनेकदा विश्रांतीसाठी या ठिकाणी येत असत. हा बंगला खालापूर तालुक्यात असला तरी कर्जतचा बंगला म्हणून प्रसिद्ध आहे. बाळासाहेब ठाकरे मीनाताई यांच्यासमवेत विश्रांतीसाठी या बंगल्यात अनेकदा येत असत. बाळासाहेबांचे विशेष प्रेम असलेल्या या बंगल्यात आता फारसा कुणाचाही वावर नसतो. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बंगला नव्याने उभारला. त्यासाठी बाळासाहेब स्वत: उद्धव ठाकरे यांच्यासमवेत १८ जानेवारी २०१० रोजी या बंगल्याच्या पाहणीसाठी आले होते. या परिसरात असलेल्या एन. डी. स्टुडिओच्या आवारात बाळासाहेबांचे हेलिकॉप्टर उतरले होते. त्यानंतर बाळासाहेबांनी येथील परिसरात फेरफटका मारून या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ निवांतपणाचा अनुभव घेतला. या बंगल्याच्या फार्महाउसची जागा खोलगट भागात आहे. त्यातच हा बंगलाही उतरणीवर आहे. त्यामुळे नूतनीकरण करताना या ठिकाणी भराव टाकून बंगला उभारण्याची सूचना बाळासाहेबांनी केली होती. त्यानंतर अडीच वर्षात बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण करण्यात आले.
या बंगल्यावरून आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसर आणि पक्षीनिरीक्षण करण्याची आवड बाळासाहेबांना होती. बंगल्यावरून समोरील पाझर तलावही पाहता यावा, यासाठी बंगल्याची उंची वाढवण्यात आली होती. बंगल्याच्या उभारणीत जांभा दगडाचा वापर करण्यात आला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेबांना अलीकडच्या काळात या बंगल्यात वास्तव्य करणे शक्य झाले नाही.