आयपीएलच्या सातव्या हंगामासाठीच्या दुस-या दिवशीच्या लिलावात भारताचे १३ रणजीपटू ‘करोडपती’ झाले.
बंगळूरु- आयपीएलच्या सातव्या हंगामासाठीच्या दुस-या दिवशीच्या लिलावात भारताचे १३ रणजीपटू ‘करोडपती’ झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या (अनकॅप) क्रिकेटपटूंच्या लिलावात गुरुवारी रेल्वेचा अष्टपैलू करन शर्मा सर्वात महागडा ठरला. हैदराबाद सनरायझर्सनी त्याच्यासाठी पावणेचार कोटी मोजले. हिमाचल प्रदेशचा २६ वर्षीय अष्टपैलू ऋषी धवन (तीन कोटी) आणि महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधवसह (दोन कोटी) मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीने (एक कोटी १० लाख) करोडपती होण्याचा मान मिळवला. रणजी करंडकातील उंचावलेल्या कामगिरीमुळे अनेक देशांतर्गत क्रिकेटपटूंना मोठी बोली लागली.
आयपीएल लिलावाच्या इतिहासात प्रथमच ‘अनकॅप’ क्रिकेटपटूंना लिलावात सामावून घेण्यात आले.धवनला किंग्ज इलेवन पंजाब तसेच जाधवला दिल्ली डेअरडेव्हिल्सने करारबद्ध केले. करन, ऋषी आणि केदारनंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ब्युरान हेन्ड्रिक्स (किंग्ज इलेवन पंजाब, १.८ कोटी), दिल्लीचा अष्टपैलू रजत भाटिया (राजस्थान रॉयल्स, १.७ कोटी), कर्नाटकचा फलंदाज मनिष पांडे (कोलकाता नाइट रायडर्स, १.७ कोटी), मुंबईचा यष्टिरक्षक, फलंदाज आदित्य तरे (मुंबई इंडियन्स, १.६ कोटी), कर्नाटकचा सलामीवीर मयांक अगरवाल (दिल्ली डेअरडेव्हिल्स, १.६ कोटी), मध्यमगती गोलंदाज ईश्वर पांडे (चेन्नई सुपर किंग्ज, १.५ कोटी), पंजाबचा फलंदाज गुरकीरत सिंग (किंग्ज इलेवन पंजाब, १.३ कोटी), गुजरातचा मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स, १.२ कोटी), मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी (राजस्थान रॉयल्स, १.१ कोटी) आणि कर्नाटकचा सलामीवीर लोकेश राहुलला (हैदराबाद सनरायझर्स, एक कोटी) एक कोटी आणि त्याहून बोली लागली. जम्मू आणि काश्मिरचा ऑफस्पिनर परवेझ रसूल ‘करोडपती’ होता होता वाचला. हैदराबाद सनरायझर्सनी ९५ लाखाला करारबद्ध केले. अष्टपैलू जलाज सक्सेना (मुंबई इंडियन्स, ९० लाख), डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम (हैदराबाद सनरायझर्स, ८५ लाख) आणि करुण नायर (राजस्थान रॉयल्स, ७५ लाख), अक्षर पटेलाही (किंग्ज इलेवन पंजाब, ७० लाख) चांगली बोली लागली. माजी ज्युनियर वर्ल्डकप विजेता कर्णधार, दिल्लीचा उन्मुक्त चंदला राजस्थानने ६५ लाखांत करारबद्ध केले.
मागील मोसमात खेळलेला करन शर्माला कायम ठेवण्यात हैदराबाद सनरायझर्सला यश आले. २०१२-१३ मध्ये २५ वर्षाखालील सवरेत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू ठरलेल्या करनची आधारभूत किंमत (बेस प्राइज) ३० लाख होती. मात्र त्याने बेस प्राइजच्या तुलनेत त्याने जवळपास अकरापट अधिक कमाई केली. करनला करारबद्ध करण्यासाठी सुरुवातीला चेन्नई आणि दिल्लीने उत्सुकता दाखवली. मात्र बोली ७० लाखावर पोहोचल्यानंतर दिल्लीने काढता पाय घेतला. चेन्नईने बोली लावतानाच ७५ लाखानंतर पंजाबने लिलावात प्रवेश केला. त्यामध्ये त्यानंतर हैदराबादची भर पडली. हैदराबादने एक कोटीवर बोली गेल्यानंतर पंजाबने बोली लावली तर सनरायझर्सनी जोर लावताना करनला आपल्याकडे कायम ठेवले.
२० लाखाची ‘बेस प्राइज’ असलेला ऋषी धवनही सुदैवी ठरला. त्याला तीन कोटी मिळाले तरी तो ‘अनसोल्ड’ होता होता वाचला. मागील संघ मुंबई इंडियन्सने धवनला ४० लाखाची बोली लावली. मात्र त्यानंतर त्यांनी रस दाखवला नाही. बोली ७० लाखांपर्यंत गेल्यानंतर पंजाबनेही दावा केला नाही. पंजाबने कंबर कसल्याने पुढे हैदराबादने ऋषीचा नाद सोडून दिला. मुंबई इंडियन्सने ‘लोकल बॉय’ आदित्य तरेला आपल्याकडे ठेवले. त्यानंतर जसप्रीत बुमराहलाही करारबद्ध केले.
पहिल्या दिवशीच्या ‘अनसोल्ड’ क्रिकेटपटूंपैकी ४१ फलंदाज, ३७ गोलंदाज आणि २४ अष्टपैलूंना दुस-या दिवशी पुन्हा लिलावात आणण्यात आले. मात्र पहिल्या फेरीत फ्रँचायझींनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. दुस-या फेरीत ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज ख्रिस लीन ‘लकी’ ठरला. ५० लाख ‘बेसप्राइज’ असताना एक कोटी आणि ३० लाखांत कोलकाताने त्याला घेतले. ऑस्ट्रेलियाचाच वेगवान गोलंदाज पॅट्रिक कमिन्सलाही (एक कोटी) त्याच्या आधारभूत किंमतीत कोलकाताने करारबद्ध केले. नमन ओझाला (५० लाख) हैदराबादने आपल्याकडे ठेवले. पहिल्या फेरीत कुणीही करारबद्ध न केलेल्या (अनसोल्ड) अपूर्व वानखेडे (मुंबई इंडियन्स, १० लाख), तन्मय मिश्रा (बंगळूरु, १० लाख) आणि मिलिंद कुमारला (दिल्ली, १० लाख) या ‘अनकॅप’ क्रिकेटपटूंना दुस-या फेरीत बोली लागली.
‘सर्वाधिक बोलीने विचलित झालेलो नाही’
आयपीएलमधील पहिल्या आणि सर्वाधिक बोलीने विचलित झालेलो नाही, असे रेल्वेचा अष्टपैलू करन शर्माने गुरुवारी म्हटले. ‘‘कुणा तरी फ्रँचायझीने बोली लावावी, असे मला वाटत होते. मला बोली लागल्याने मी आनंदी आहे. पंजाबलाही चांगला लेगस्पिनर हवा असल्याने त्यांच्यासह हैदराबादमध्ये बोलीमध्ये मोठी चुरस होईल, असे वाटले होते. मात्र इतकी बोली लागेल, असे ध्यानी मनी नव्हते. हैदराबादने माझ्यासाठी आग्रह धरल्याने आता माझी जबाबदारीही वाढली आहे,’’ असे करनने गुरुवारी सांगितले.
टेलरला बोली लागली पण जयवर्धने, सॅम्युअल्स, गप्टिल ‘अनसोल्ड’
पहिल्या दिवशी कुणीही करारबद्ध न केलेला न्यूझीलंडचा रॉस टेलरसह हॉलंडचा रायन टेन डोएशाते आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू केवॉन कूपरला बोली लागली तरी श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज माहेला जयवर्धने, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू मार्लन सॅम्युअल्स, ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू कॅमेरॉन व्हाइट आणि डेव्हिड हसी तसेच न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिल दुस-या दिवशीही ‘अनसोल्ड’ राहिले. टेलरला दिल्लीने त्याच्या आधारभूत किंमतीत (दोन कोटी) करारबद्ध केले. डोएशाते (एक कोटी) आणि कूपरला (३० लाख) अनुक्रमे कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ‘बेसप्राइज’मध्ये विकत घेतले.
‘राइट टु मॅच कार्ड’ पुन्हा चालले
पहिल्या दिवसाप्रमाणे दुस-या दिवशीही ‘राइट टु मॅच कार्ड’द्वारे क्रिकेटपटूंना पुन्हा आपल्याकडे घेण्यात अनेक संघमालकांनी उत्सुकता दाखवली. महाराष्ट्राचा केदार जाधव आणि झारखंडचा शादाब नदीमला करारबद्ध करताना दिल्लीने दोनदा ‘राइट टु मॅच कार्ड’चा वापर केला. किंग्ज इलेवन पंजाबने ‘लोकल बॉय’ मनदीप सिंगसाठी, राजस्थान रॉयल्सने ४१ वर्षीय लेगस्पिनर प्रवीण तांबेसाठी (१० लाख) तसेच बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सने ‘राइट टु मॅच कार्ड’द्वारे हरयाणाचा मध्यमगती हर्षल पटेलला आपल्याकडे कायम ठेवले.
[EPSB]
आयपीएल सातमध्ये युवराज सिंग १४ कोटींचा धनी
क्रिकेट पेक्षा सट्टेबाजी, सामना निश्चितीच्या आरोपांमुळे अधिक चर्चेत राहिलेल्या इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) सातव्या मोसमासाठी क्रिकेटपटूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे.
[/EPSB]