जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारसाठी एका बसमध्ये धमकीचे पत्र आणि एक पिस्तोल आढळून आल्याने त्याच्या सुरक्षेत दिल्ली पोलिसांनी वाढ केली आहे.
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारसाठी एका बसमध्ये धमकीचे पत्र आणि एक पिस्तोल आढळून आल्याने त्याच्या सुरक्षेत दिल्ली पोलिसांनी वाढ केली आहे. आयएसबीटी ते जेएनयू कॅम्पसपर्यंत धावणा-या बसमध्ये हे पत्र आढळले आहे.
बसचालकाला त्याच्या बसमध्ये एक बेवारस बॅग सापडली. त्यांनी तात्काळ पोलिसांना या बॅगेबद्दल माहिती दिली. त्या बॅगमध्ये एक गावठी पिस्तुल आणि धमकीपत्र आढळले. ही बॅग कोणाची आहे, याची चौकशी सुरू आहे.
बसमध्ये सापडलेल्या धमकी पत्रात कन्हैय्या कुमार आणि उमर खालीद यांचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे.
पत्र लिहिणा-या व्यक्तीने याअगोदरही फेसबुकवरुन कन्हैय्याला धमकी दिली होती. ‘ज्यामध्ये जेएनयू कॅम्पसमध्ये हत्यारांसहित आमची लोक हजर आहेत, कोणत्याही क्षणी त्याची हत्या करण्यासाठी तयार आहोत’, असे लिहिण्यात आले होते.
धमकी पत्र मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कन्हैयाच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. ज्यावेळी कन्हैया कॅम्पसमधून बाहेर जातो, त्यावेळेस पोलीस स्थानकात याची माहिती देण्याचे आदेश जेएनयूला देण्यात आले आहेत.