कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले.
कणकवली- कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुविधा साटम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिका-यांकडे सादर केला. तसेच माधुरी गायकवाड या नगरसेविकेनेही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर के ला आहे. निवडणूक अधिकारी समीर घारे यांनी दोन्ही उमेदवारी अर्ज छाननीनंतर वैध ठरले असल्याचे सांगितले.
कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्रे भरण्याची आणि छाननीची शनिवारी मुदत होती. काँग्रेसच्या उमेदवार सुविधा साटम यांना माया सांबरेकर सूचक; तर किशोर राणे अनुमोदक आहेत. दुसरा उमेदवार माधुरी गायकवाड यांना रूपेश नार्वेकर सूचक, तर सुमेधा अंधारी अनुमोदक आहेत.
छाननीदरम्यान सुविधा साटम यांनी माधुरी गायकवाड यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आपण असून; माधुरी गायकवाड या अधिकृत उमेदवार नसल्याचे तक्रारी अर्जात नमूद करून गायकवाड यांचा अर्ज रद्द करावा, अशी मागणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी कणकवली तहसीलदार समीर घारे आणि साहायक निवडणूक निर्णय अधिकारी अवधूत तावडे यांनी यासंदर्भात निर्णय देताना नगरपंचायत सभागृहात तशा पद्धतीचा गट रजिस्टर नसल्याचे कारण देत त्यांचा अर्ज फेटाळण्यात
आल्याचे सांगितले.
काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी सुविधा साटम यांनी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी आमदार नितेश राणे, सतीश सावंत, संदेश सावंत, रणजीत देसाई, अॅड. प्रज्ञा खोत, समीर नलावडे, मेघा गांगण, किशोर राणे, अभी मुसळे, गौतम खुडकर, माया सांबरेकर, अण्णा कोदे, बंडू हर्णे उपस्थित होते.