देवनार कचरा भराव भूमीतील आगीच्या घटनेनंतर हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असल्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी केली.
मुंबई – देवनार कचरा भराव भूमीतील आगीच्या घटनेनंतर हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असल्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी केली. आयुक्तांच्या या घोषणेचा विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांच्याकडून समाचार घेण्यात आला. मुंबईत जेवढय़ा म्हणून कचरा भराव भूमी आहेत.. मग ते देवनार असो वा मुलुंड असो किंवा कांजूरमार्ग. या जागा प्रतिबंधितच आहेत. परंतु महापालिका प्रशासन याची योग्य अंमलबजावणी करत नव्हती. हे या प्रशासनाचे मोठे अपयश आहे. प्रशासनाने आज हे जाहीर करून आपण अपयशी ठरलो असल्याचे दाखवून दिले असल्याचा टोला छेडा यांनी मारला आहे.
देवनार कचरा भराव भूमीत रविवारी सकाळी आग लागून धुराने मुंबईकरांना पुन्हा नाकीतोंडी दम आणला. या प्रदूषणामुळे लोकांना होणारा त्रास, आरोग्यास निर्माण होणारा धोका यामुळे संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यात अयशस्वी ठरलेल्या प्रशासनाच्या निष्क्रिय वृत्तीचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी स्थायी समितीच्या मंगळवारी होणा-या सभेचे कामकाज न होता ते तहकूब करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
देवनारमधील समाजकंटकांना आत टाका
देवनार कचरा भराव भूमीची भिंत बांधण्याचे काम होऊ नये म्हणून या आगी लावण्याचे प्रकार समाजकंटक करत आहेत. केवळ एफआयआर दाखल न करता या सर्व समाजकंटकांना पोलीस कोठडीत डांबायला हवे, अशी मागणी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली आहे.
समाजवादी पक्षाचे गाडय़ा अडवून आंदोलन
देवनार कचरा भराव भूमीबाबत प्रशासन आणि सत्ताधारी पक्षांकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी समाजवादी पक्षाच्यावतीने प्रत्येक आठवडय़ाला कचरा भराव भूमीजवळ तीव्र आंदोलन केले जाणार आहे. एक दिवस कच-याच्या गाडय़ा भराव भूमीत जाऊ देता अडवल्या जातील. यामुळे मुंबईकरांना जो त्रास होईल, याला प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष जबाबदार राहील, असा इशारा सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी दिला.
शिवसेनेकडून श्वेतपत्रिकेची मागणी
मुंबईतील देवनार येथे वारंवार लागणा-या भीषण आगीची जबाबदारी स्वीकारून तसेच मुंबईतील इतर कचरा भराव भूमीसंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्राध्यापक अवकाश जाधव यांनी आयुक्तांकडे केली आहे.