महाराष्ट्र राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक फर्टिलायझर अँड पेट्रोकेमिकल कंपनीला कंत्राटी पद्धत बंद करण्याचे आदेश दिले होते.पण त्यानंतरही व्यवस्थापनाने कंत्राटी पद्धत सुरु ठेवली आहे.
पनवेल – कंत्राटी कामगार पद्धत निर्मूलन करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक फर्टिलायझर अँड पेट्रोकिमिकल कंपनीला दिले आहेत. दीपक फर्टिलायझरमधील कंत्राटी कामगारांनी नोव्हेंबर 2011 मध्ये नवी मुंबई जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून युनियन स्थापन केली होती. युनियन स्थापन केल्याच्या रागातून व्यवस्थापनाने के- एक प्लँटमधील तीन तर के सात/आठ मधील 28 कामगारांना कामावरून काढून टाकले होते. दीपक फर्टिलायझरमधील सर्व कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करून घ्यावे, तसेच विनाकारण कामावरून बडतर्फ केलेल्या कामगारांना कामावर ताबडतोब घेण्यात यावे, यासाठी नवी मुंबई जनरल कामगार संघटनेने कंपनीकडे वारंवार मागणी केली होती. मात्र कंपनीने कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मुजोरपणा सुरूच ठेवला होता. त्यामुळे संघटनेने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने कामगारमंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार कामगारमंत्र्यांनी कंपनी व्यवस्थापनाला बडतर्फ कामगारांना ताबडतोब कामावर घेण्याचे आदेश दिले होते. मात्र कंपनीने या आदेशाला न जुमानले तर नाहीच, शिवाय या निर्णयाची अंमलबजावणीही केली नाही. कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार कामगारमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कामगार कल्याण मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीत मुश्रीफ यांनी कंत्राटी कामगार पद्धत निर्मूलन करण्याचे आदेश दीपक फर्टिलायझरच्या व्यवस्थापनाला दिले.
या वेळी नवी मुंबई जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष वैभव पाटील यांनी संघटनेच्या वतीने कामगारांची बाजू मांडली. या बैठकीस कामगार नेते भाई जगताप, अशोक पोहेकर, सहाय्यक कामगार आयुक्त सु. बा. बागल, कामगार कल्याण मंडळाचे सदस्य तसेच कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी परांजपे, जयश्री काटकर उपस्थित होते.