औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर केंद्रीय औषधी नियंत्रकांनी बंदी घातली आहे. बुधवारी तसा आदेश जारी करण्यात आला. या नियमाचा भंग करणा-या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली – औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर केंद्रीय औषधी नियंत्रकांनी बंदी घातली आहे. बुधवारी तसा आदेश जारी करण्यात आला. या नियमाचा भंग करणा-या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकार यावर अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत ही बंदी कायम राहील, असे सांगण्यात आले. राज्य औषध निरीक्षकांना या नियमाची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यास सांगितले आहे.
नियंत्रकांच्या मते, अनेक वैद्यकीय प्रतिनिधींनी गेल्या काही दिवसात आपली भेट घेऊन औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर चिंता व्यक्त केली. अशा प्रकारची विक्री ही लोकांसाठी जीवघेणी ठरू शकते आणि ऑनलाईन विक्रीत औषध परत घेण्याचीही तरतूद नाही. शिवाय औषध साठवणुकीबाबतचे नियम पाळले जातील, याचीही शाश्वती नसते. तसेच ऑनलाईन प्रिस्क्रिप्शनवरही नियंत्रकांनी आक्षेप घेतले आहेत. सध्या अनेक औषध कंपन्यांनी आजारांवर समुपदेशनासोबतच औषधांची विक्रीही ऑनलाईन सुरू केली आहे.
मागणी येताच केमिस्टद्वारे या कंपन्या औषधे पुरवतात. परंतु हा प्रकार सुरक्षित मानला जात नाही. समितीचा अहवाल येईपर्यंत अशा प्रकारच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालण्यात येत असल्याचे केंद्रीय निरीक्षकांनी राज्यांना पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे. समितीच्या अहवालानंतरच सरकार अंतिम निर्णय घेईल.