अल कईदा या दहशतवादी संघटनेचा ठार झालेला प्रमुख ओसामा बिन लादेन एका डोळ्याने आंधळा होता, असा दावा त्याच्यानंतर हे पद सांभाळण्याऱ्या अयमान अल जवाहिरीने केला आहे
अल कईदा या दहशतवादी संघटनेचा ठार झालेला प्रमुख ओसामा बिन लादेन एका डोळ्याने आंधळा होता, असा दावा त्याच्यानंतर हे पद सांभाळण्याऱ्या अयमान अल जवाहिरीने केला आहे. लादेनला त्याच्या तरुणपणी झालेल्या अपघातात त्याचा उजवा डोळा गमवावा लागला होता आणि तो एके काळी ‘मुस्लिम ब्रदरहुड’चा सदस्य होता, अशी माहिती जवाहिरीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये दिली आहे. ओसामा बिन लादेनला आदरांजली म्हणून ‘डेज विथ द इमाम’ नावाचा व्हिडिओ एका मूलतत्त्ववादी इस्लामी संघटनेच्या वेबसाइटवर अल कईदाकडून अपलोड करण्यात आला आहे.
अरब जगतात मुस्लिम ब्रदरहुड सर्वाधिक प्रभावी आणि इस्लामी चळवळीमधील सर्वात मोठी चळवळ मानली जाते. ब-याच अरब देशांमध्ये ही संघटना अतिशय मोठी राजकीय विरोधी पक्ष बनली आहे. या संघटनेचा सदस्य असलेल्या ओसामा बिन लादेनने अफगाणिस्तानमधील रशियाविरोधात जिहाद अर्थात धर्मयुद्ध पुकारण्याचा आग्रह धरल्यावर त्याला या संघटनेतून काढून टाकण्यात आले. त्यावेळी तालिबानकडे पैसे पोहोचवण्यासाठी पाकिस्तानमधील पेशावर या अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या शहरापर्यंत लादेनने प्रवास केला होता. मात्र, त्यानंतर सशस्त्र लढय़ात सहभागी होण्याच्या ब्रदरहुडच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
जवाहिरीचा हा व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वीचा असावा, असे दिसत आहे. कारण त्यामध्ये जवाहिरीने रमझानच्या महिन्याची सुरुवात होणार असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. जवाहिरीचा भाऊ मोहम्मद याने या महिन्याच्या सुरुवातीला ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याची ‘वैयक्तिक शांतता योजना’ मांडली होती. या योजनेद्वारे इस्लामवादी व पाश्चिमात्य जगामध्ये समझोता करण्याचे विचार त्याने व्यक्त केले होते. याबाबत जवाहिरीनेही सहमती व्यक्त केली आहे. तो आणि त्याचा भाऊ यांची विचारसरणी सारखीच असल्याचे त्याने सांगितले आहे.
ज्या प्रकारे इतर लोक जीवनावर प्रेम करतात, त्याच प्रकारे आमचे लोक मृत्यूवर प्रेम करतात, असे त्याने एका वार्ताहराला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. मात्र, कधीही न संपणा-या हिंसाचाराच्या चक्रात आम्हाला अडकायचे नाही. इतरांप्रमाणेच आम्हालाही शांततेने जगायचे आहे, असे त्याने म्हटले आहे. रक्तपिपासू, क्रूरकर्मा किंवा दहशतवादी अशी माझी किंवा माझ्या भावाची जी प्रतिमा तयार करण्यात आली आहे ती चुकीची असल्याचे जवाहिरीने सांगितले आहे.