ऑगस्टा वेस्टलॅँड प्रकरणी खोटारडेपणा केल्याबद्दल संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव देण्याचे काँग्रेसने गुरुवारी जाहीर केले.
नवी दिल्ली- ऑगस्टा वेस्टलॅँड प्रकरणी खोटारडेपणा केल्याबद्दल संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव देण्याचे काँग्रेसने गुरुवारी जाहीर केले. राज्यसभेच्या कामकाजाचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे.
येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, संसदेत पर्रिकर व स्वामी हे धडधडीत खोटे बोलत होते. त्यांनी देशाच्या जनतेची दिशाभूल केली. पर्रिकर यांनी संसदेत केलेल्या निवेदनात इटलीच्या न्यायालयाचा निकाल नव्हता. तसेच कॉँग्रेस नेतृत्वाला न्यायालयाने आरोपी ठरवलेले नाही, असे स्पष्टीकरण रमेश यांनी दिले.
स्वामी यांनी धडधडीत खोटे आरोप केले आहेत, असा आरोप करून रमेश म्हणाले की, इटलीच्या न्यायालयाचा निकाल आपण स्वत: वाचला आहे. तो १३ पानांचा निकाल होता. मात्र, स्वामी यांनी आपल्याच ईमेलवरून स्वत:लाच दोन पानांचा ईमेल पाठवला, असे उघड झाले.
स्वामी यांनी ४ मे रोजी धडधडीत खोटारडेपणा केला. त्यासाठी त्यांनी खोटया कागदपत्रांचा वापर केला. पर्रिकर व स्वामी यांनी देशाची दिशाभूल केली आहे. याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असे ते म्हणाले.
अमेरिकेतील वेबसाईट www.pguru.com कागदपत्रे स्वामी यांनी वापरली. या वेबसाईटच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी बदनामीचा खटला दाखल करणार आहे.
स्वामी, एस. गुरुमूर्ती, आयआयएमचे प्राध्यापक आर. वैद्यनाथन यांचा त्या वेबसाईटशी संबंध आहे. ही वेबसाईट सिलिकॉन व्हॅलीतील श्री. अय्यर यांच्याशी संबंधित आहे. आर. वैद्यनाथन हे रिझर्व्ह बॅँकेचे भावी गव्हर्नर व्हावेत, अशी स्वामींची इच्छा आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.