अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे नाव चक्क छत्तीसगडमधील मतदार यादीत असल्याची बाब उघड झाली आहे.
रायगड- प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे नाव चक्क छत्तीसगडमधील मतदार यादीत असल्याची बाब उघड झाली आहे. मात्र या नावाचे कोणीही संबंधित पत्त्यावर आढळले नसल्याने जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
छत्तीसगडमधील पथळगाव विधानसभा क्षेत्रातील घौघरी या गावातील मतदार यादीत ऐश्वर्याचे नाव आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऐश्वर्याच्या नावापुढे तिचेच छायाचित्र असल्याने ही चूक नावाच्या साधर्म्यामुळे झाली, असे म्हणता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी एल. एस. केन यांनी सांगितले.
ऐश्वर्या राय, मतदान केंद्र १५, वय-२३, घर क्रमांक ३७६ अशी माहिती मतदार यादीत देण्यात आली आहे. मात्र या भागात अशा नावाची कोणतीही व्यक्ती आढळली नाही, असे ते म्हणाले. याची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी के. पी. देवगण यांना देण्यात आले असून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.