श्रीलंका प्रीमियर लीगमधील (एसपीएल) एका संघाच्या मालकाने भारतीय सट्टेबाजांकडे ‘फिक्सिंग’साठी ५० कोटी रुपयांची मागणी केल्याची बाब पुढे आली आहे.
मुंबई – श्रीलंका प्रीमियर लीगमधील (एसपीएल) एका संघाच्या मालकाने भारतीय सट्टेबाजांकडे ‘फिक्सिंग’साठी ५० कोटी रुपयांची मागणी केल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत याच संघाच्या एका भागीदाराने मुंबई गुन्हे शाखेला गेल्या वर्षी पत्र लिहिले होते.
पण हा सर्व प्रकार श्रीलंकेत घडल्यामुळे गुन्हे शाखेने त्याबाबत कोणताही तपास केला नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आयपीएलमध्ये सट्टेबाजीप्रकरणी संघाचे मालक संशयाच्या भोव-यात सापडले असताना आता एसपीएलमध्येही असे प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सट्टेबाजी व स्पॉटफिक्सिंगमुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) वादाच्या भोव-यात सापडली असतानाच आता ‘श्रीलंका प्रीमियर लीग’मधील (एसपीएल) एक संघच डमी खरेदीदारामार्फत सट्टेबाजांनी खरेदी केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली होती.
अटकेच्या भीतीने दुबईला पळालेले सट्टेबाज पवन व संजय जयपूर यांनी या संघात पैसे गुंतवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते, याची पडताळणी सुरू आहे. पण आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. एसपीएलमधील सात संघांपैकी सर्व संघ भारतीय नागरिकांनी विकत घेतले आहेत. त्यातील एक संघ मुंबईतील दोन भावांनी खरेदी केला होता.
गेल्या वर्षी भागीदारीवरून या दोन भावांमध्ये झालेल्या वादातून त्यातील एकाने गुन्हे शाखेला पत्र लिहून त्याचा भाऊ भारतीय सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली होती. यावेळी त्याच्या भावाने भारतीय सट्टेबाजांना भेटून ५० कोटी रुपये द्या आणि फिक्सिंग करा, अशी ऑफरही या सट्टेबाजांना दिली होती. पण, या पत्रातील भावाचा पत्ता व गुन्ह्याचे स्थळ श्रीलंकेत असल्यामुळे या प्रकरणी कोणताही तपास केला नाही. केवळ याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली होती.
विंदूची १९९३ मध्येच सट्टेबाजाशी ओळख झाली
सट्टेबाजीप्रकरणी गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलेला दिल्लीतील बांधकाम व्यवसायिक व पूर्वाश्रमीचा सट्टेबाज आनंद सक्सेना याची व विंदूची ओळख १९९३ मध्ये एका चित्रपटाच्या मुहूर्तावर झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे. १९८७ पासून २००७ पर्यंत सट्टेबाजीच्या धंद्यात असलेल्या सक्सेनाने त्यानंतर सट्टेबाजी सोडून बांधकाम व्यवसाय करण्यास सुरुवात केली. या सक्सेनाने विंदूची पवन व संजय जयपूर या दोन सट्टेबाज भावांशी ओळख करून दिली होती. दुबईत पळालेल्या या दोघांनी दुबईतही मालमत्ता खरेदी केली असून तेथे या दोघांचे एक पेंटाहाउस असल्याचेही गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आले आहे.