आर्थिक तोटय़ात असल्याने एसटी महामंडळाकडून हा तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात.
मुंबई- आर्थिक तोटय़ात असल्याने एसटी महामंडळाकडून हा तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. महामंडळाच्या या अभियानाला एसटीच्या चालकांचा देखील मोठा हातभार लागत असून अपघातांच्या संख्येत घट झाल्याने नुकसानभरपाईपोटी देण्यात येणा-या रकमेत मागील वर्षीच्या तुलनेत ५ ते ६ कोटी रुपयांची घट झाली आहे. यामध्ये दर एक लाख किलोमीटरमागे अपघातांचे असणारे प्रमाण ०.१५ टक्क्यावरून घसरून ०.१४ टक्के एवढे झाले आहे.
एसटीच्या अपघातांचा विचार करता गेल्या चार वर्षात एसटीच्या अपघातांत १ हजार ८६५ जणांचा मृत्यू झाला असून २०१५-१६ मध्ये ४०७ जणांचा समावेश आहे. या अपघातातील मृत्युमुखींच्या नातेवाईकांना आणि जखमींना दिलेल्या मदतीपोटी एसटीला मोठा आर्थिक फटका देखील बसला.
यामध्ये २०१२-१३ मध्ये ४०.२३ कोटी नुकसानभरपाई एसटीकडून अपघातग्रस्तांना देण्यात आली होती. तर १३-१४ मध्ये ३७.७७ कोटी, १४-१५ मध्ये ४६.०७ कोटी आणि तर १५-१६ मध्येही जवळपास ४० कोटींच्या आत नुकसानभरपाई देण्यात आली. त्यामुळे चालकांच्या जबाबदारीचे कौतुक करण्यात येत आहे.
अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एसटीच्या चालकांमध्ये महामंडळाकडून जनजागृती केली जाते. मद्यपान करून वाहन न चालवणे,ओव्हरटेक न करणे, जलद गतीने वाहन न चालवण्याच्या सूचना करतानाच त्याची माहितीही दिली जाते. एसटी महामंडळाकडून तर अपघात टाळण्यासाठी बसेसना ताशी ६५ कि.मी.चे स्पीड लॉकही लावले आहेत.
या स्पीड लॉकमुळे एसटी बसेस ताशी ६५ किलोमीटरपेक्षा जास्त गतीने धावू शकत नाहीत. या उपाययोजना करतानाच विनाअपघात प्रवास करणा-या चालकांसाठी महामंडळाने प्रोत्साहन योजनाही सुरू केल्या आहेत.
नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ
एसटी महामंडळाने नव्याने अपघात निधी विमा योजना सुरू केली असून अपघातग्रस्तांना देण्यात येणा-या नुकसानभरपाईमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी एसटीच्या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकाला ३ लाख रुपये मिळत होते. त्यानंतर या रकमेत वाढ करून घेण्यासाठी कायदेशीर मार्गाचा पर्याय उपलब्ध होता.
त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार रकमेत वाढ करावी लागत होती. मात्र,आता मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणा-या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्यात आली असून दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर कायमस्वरूपी विकलांगतेत पर्यवसान होणा-या दुखापतीला ५ लाख रुपये मिळतील.
त्याचप्रमाणे अंशत: होणा-या दुखापतीच्या मिळणा-या रकमेतही वाढ झाली असून अडीच लाख रुपये मिळतील आणि तात्पुरत्या दुखापतीत एक लाख रुपये मिळणार आहेत. याकरता महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटांवर एक रुपये अतिरिक्त अधिभार आकारला आहे.