मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात परळच्या महर्षी दयानंद (एमडी) महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अविनाश कारंडे यांचा मृत्यू झाला.
मुंबई- मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात परळच्या महर्षी दयानंद (एमडी) महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अविनाश कारंडे यांचा मृत्यू झाला. ते ३९ वर्षांचे होते.
महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले कारंडे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणूनही काम पाहत होते. त्यांच्या जाण्याने एमडीचे एनएसएस युनिट पोरके झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमडीचे एनएसएस युनिट रविवारीच पर्यावरण दिनानिमित्त बदलापूर, दहिवली परिसरातील धामनवाडी, तारवाडी व भोज गावात वृक्षारोपणाचा प्रकल्प राबवणार होते. मात्र त्यांचे हे स्वप्न त्यांचे विद्यार्थी पूर्ण करतील, अशी प्रतिक्रिया त्यांचा विद्यार्थी सुशांत भोसले याने व्यक्त केली.
कारंडे हे महाविद्यालतील उत्तम शिक्षकांपैकी एक होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाविद्यालयाला धक्का बसल्याची भावना महर्षी दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य टी.पी. घुले यांनी व्यक्त केली आहे.