मुंबई शहर, उपनगरातील जमिनींचा तुटवडा, परिणामी गगनाला भिडणा-या घरांच्या किमती यामुळे ‘मुंबई महानगर प्रदेशा’त (एमएमआर) गृहप्रकल्प राबवण्यात गृहनिर्माण संस्थांचा कल दिसत आहे.
मुंबई- मुंबई शहर, उपनगरातील जमिनींचा तुटवडा, परिणामी गगनाला भिडणा-या घरांच्या किमती यामुळे ‘मुंबई महानगर प्रदेशा’त (एमएमआर) गृहप्रकल्प राबवण्यात गृहनिर्माण संस्थांचा कल दिसत आहे. येत्या काळात एमएमआरडीएद्वारे एमएमआर विभागात परवडणा-या दरातील गृहप्रकल्प राबवण्याचा विचार आहे. घरांच्या किमती कमी ठेवता याव्यात यासाठी स्वस्त दरातील जमिनींचा शोध घेण्यात येणार आहे. महागाईच्या वातावरणात स्वत:च्या हक्काचे घर घेऊ इच्छिणा-यांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार असली तरी घरांच्या किमती मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे घरांसोबतच जवळच वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देत बससाठी विशेष मार्गिका असणारा ‘बस रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम’ (बीआरटीएस) हा प्रकल्प राबवणेही विचाराधीन आहे. एमएमआरडीए आणि ‘युनिफाईड मुंबई मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी’ची (उम्टा) नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत परवडणा-या दरातील घरे आणि बीआरटीएसच्या बांधणीचा प्रस्ताव मांडला गेला. उम्टा हे एक शासनाचे अंग असून एमएमआरमधील वाहतूक प्रकल्प राबवण्यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी, आराखडा बनवणा-या विविध संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य करते. एमएमआर विभागात कोणकोणत्या विभागात स्वस्त दरात जमिनी उपलब्ध आहेत याचा शोध घेण्यात येईल. जेणेकरून परवडणा-या दरातील घरांची बांधणी करणे शक्य होईल. रेल्वे स्थानकांपासून १० कि.मी. लांब परिसरात गृहप्रकल्प उभारणे विचाराधीन असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांनी सांगितले.
तसेच प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी घरांच्या जवळच बस मार्गीकांसाठी विशेष बीआरटिएस प्रकल्प उभारण्याचे विचाराधीन असल्याचेही ते पुढे म्हणाले. विविध उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणा-या दरातील घरे उपलब्ध करुन देण्यासाठी बांधकाम खर्च, जमिनींचे दर, जमिनींची उपलब्धता, घरांच्या किमती या सगळय़ांचा विचार केला जाणार आहे. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास इतर गृहनिर्माण संस्थांसोबत संयुक्तरीत्या हा गृहप्रकल्प राबवण्यात येईल.