लोकसभेची निवडणूक वेगवेगळया टप्प्यांमध्ये होणार असली तरी, निवडणूक वेळेत पूर्ण होईल आणि एक जूनपूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येईल असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपथ यांनी सांगितले.
वॉशिंग्टन – पुढीलवर्षी होणारी लोकसभेची निवडणूक वेगवेगळया टप्प्यांमध्ये होणार असली तरी, निवडणूक वेळेत पूर्ण होईल आणि एक जूनपूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येईल असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपथ यांनी सांगितले.
राष्ट्रीय निवडणूक सहा ते सात टप्प्यांमध्ये होईल. निवडणूक आयोगाने आतापासूनच २०१४ च्या या निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. आठ लाख मतदान केंद्रावर ७८ कोटी लोक मतदानाचा हक्क बजावू शकतात.
मतदानासाठी एक लाखाहून अधिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेतील ब्रुकिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.
संपथ यांनी निवडणूक वेळापत्रकाबद्दल अधिक माहिती न देता मार्च महिन्यात मतदानाची पहिली फेरी होण्याचे संकेत दिले. १६ व्या लोकसभेत देशभरातून ५४३ सदस्य निवडण्यात येतील. विद्यमान पंधराव्या लोकसभेचा कालावधी ३१ मे रोजी संपत आहे.
त्यामुळे एक जूनपूर्वी १६ वी लोकसभा अस्तित्वात आणण्याची आमची जबाबदारी आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या तीन आठवडे आधी निवडणूकीसाठी अधिसूचना जारी होईल आणि निवडणूकीची घोषणा त्याच्या तीन आठवडे आधी होईल असे त्यांनी सांगितले.