पर्यावरणाचा हा-स होत असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्तीचे पूजन करण्याचे आवाहन अनेक पर्यावरणवादी संस्थांकडून होते आहे
मुंबई – पर्यावरणाचा हा-स होत असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्तीचे पूजन करण्याचे आवाहन अनेक पर्यावरणवादी संस्थांकडून होते आहे. मात्र शाडूच्या मातीपासून मोठया उंचीच्या मूर्ती मिळत नाहीत, अशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तक्रार असते. याला पर्याय म्हणून गिरगाव येथील कुडाळेश्वर गौड ब्राह्मण निवास (पेंडसे वाडी) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने फायबरची कायमस्वरूपी इको-फ्रेंडली मूर्ती तयार करून घेतली आहे. मुंबईतील ही पहिली इको-फ्रेंडली सार्वजनिक गणेशमूर्ती असून, विसर्जन मिरवणूकही काढून नंतर ती परत आणण्यात येते. या मंडळाने तीन वर्षापूर्वी सुरू केलेला हा उपक्रम सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आदर्श ठरतो आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पसंती मोठया उंचीची गणेशमूर्तीला असते. ती शाडूच्या मातीपासून होत नसल्याने मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्तीचा वापर होऊ लागला आहे. ज्या गणेशमूर्तीचे पूजन करतो, तीच मूर्ती समुद्रात विसर्जन केल्यानंतर पूर्णत: विरघळत नसल्याने पुन्हा भग्नावस्थेत बघावी लागण्याचे प्रकार होतात. त्यामुळे कुडाळेश्वर गौड ब्राह्मण निवास (पेंडसे वाडी) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने २०१०मध्ये मूर्तिकार विजय खातू यांच्याकडून फायबरची एक मूर्ती बनवून घेतली. गणेशोत्सवात मंडळ या आठ फुटी, सुमारे ७० किलो वजनाच्या मूर्तीचेच पूजन करते.
चतुर्थीला ही मूर्ती वाजतगाजत, मिरवणूक काढून आणली जाते. तर विसर्जनाच्या दिवशीही याच मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक गिरगाव चौपाटीपर्यंत निघते. तेथून ही मूर्ती परत आणली जाते. विसर्जनाचे प्रतीक म्हणून श्रीफळाचे विसर्जन केले जाते, अशी माहिती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रदीप प्रभाकर देसाई यांनी दिली.
तीन वर्षापूर्वी एकदाच सव्वा लाख रुपये खर्चून करून ही गणेशमूर्ती बनवून घेण्यात आली. गणेशोत्सवानंतर ती एका प्लॅस्टिकच्या खोक्यात बंदिस्त करून ठेवली जाते. गणेशोत्सवच नव्हे, तर माघी गणेशोत्सव आणि चतुर्थी अशा वर्षातून १२ वेळा या मूर्तीचे पूजन होते. जागा उपलब्ध असल्याने अशा प्रकारची मूर्ती बनवून ठेवणे शक्य झाल्याचे देसाई सांगतात. अन्य मंडळांनीही अशीच मूर्ती बनवून पर्यावरणासाठी अनुकूल वातावरण बनवण्यात हातभार लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अशा प्रकारे गणेशमूर्तीचे पूजन करणारे हे मुंबईतील एकमेव मंडळ आहे.
तर एक-दोन वर्षात शाडूतून घडलेल्याच मूर्ती गणेशोत्सवात वापरण्यासही काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरुवात केली आहे. निकदवरी लेन, गिरगाव मुगभाट लेन, गिरगाव क्रांतीनगर, अंधेरी कोलडोंगरी, विलेपार्ले येथील पार्ल्याचा पेशवा तसेच साई मित्र मंडळ, अंधेरी क्रांतीनगर आदी मंडळांचा यात समावेश आहे, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी सांगितले.