एकनिष्ठता, प्रामाणिकपणा शाहू सावंत यांच्याकडून शिकावा, असे त्यांचे काम होते, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी माजी महापौर स्व. शाहू सावंत यांना श्रद्धांजली अर्पण केली.
डोंबिवली – एकनिष्ठता, प्रामाणिकपणा शाहू सावंत यांच्याकडून शिकावा, असे त्यांचे काम होते, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी माजी महापौर स्व. शाहू सावंत यांना श्रद्धांजली अर्पण केली. डोंबिवली जिमखाना येथे बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या शाहू सावंत यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.
शिवसेनेत असताना शिवसेनाप्रमुखांना सांगून अनेकांना मी पदे मिळवून दिली, त्यांची कामे केली. पक्ष सोडताना माझ्यासोबत अनेक जण आले आणि निघून गेले, पण त्याची आठवण केवळ शाहू सावंत यांनी ठेवली. निष्ठा, कृतज्ञता, भावना त्यांच्या अंगी होती. मी कधीही डोंबिवलीत आलो, की समोरच शाहू माझ्या स्वागताला उभा असायचा. पण आज प्रथमच डोंबिवलीत आल्यानंतर तो दिसला नाही. त्यांच्या श्रद्धांजली सभेसाठी जड अंत:करणाने सभागृहात पाऊल ठेवताच त्यांचे तैलचित्र मात्र समोरच दिसले, अशा दु:खद भावना यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केल्या.
कोकणातून मी ६ वेळा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालो, त्याचे श्रेय केवळ शाहू सावंत यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचे होते. त्यांनी आयुष्यात जे मिळवले, ते आज इथल्या उपस्थितीवरून दिसत आहे, असेही राणे म्हणाले. मंत्रालयात चार-चार तास वाट बघत बसूनही भेटायची वेळ आल्यावर त्यांचा चेहरा नेहमी फ्रेश असायचा. त्यांनी कधीही दु:ख दाखविले नाही. नेहमी इतरांची कामे घेऊनच शाहू माझ्याकडे येत असत. स्वत:च्या कामासाठी तो कधीच आला नाही, असे राणे म्हणाले.
या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेला माजी आमदार बाळा नांदगावकर, माजी आमदार जगन्नाथ पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार रमेश पाटील, नगरसेवक विकास म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, संतोष केणे, डोंबिवली जिमखान्याचे अध्यक्ष दीपक मेजारी आदी अनेक जण उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवलीतील अनेक दिग्गजांनी आपल्या या दिलखुलास मित्राला जड अंत:करणाने श्रद्धांजली अर्पण केली. आता शाहू दिसणार नाही..कुठलाच कार्यकर्ता कधीही एका दिवसात तयार होत नाही. आणि तो गेल्यावर त्याची कारकीर्द आपण एका तासात संपवतो. मात्र अशा कार्यकर्त्यांचे काम आणि त्याचे कार्य त्याची आठवण देत राहील, असे नारायण राणे यावेळी म्हणाले. तसेच इथून पुढे डोंबिवलीत मी यावे आणि शाहू मला दिसू नये, ही माझ्या जीवनातील अत्यंत वाईट, दुर्दैवी घटना आहे, असे सांगत त्यांनी दु:ख व्यक्त केले.