उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील अतिक्रमण झालेल्या भूखंडांविषयी शनिवारी महासभेत चर्चा झाली.
उल्हासनगर – महापालिका क्षेत्रातील अतिक्रमण झालेल्या भूखंडांविषयी शनिवारी महासभेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका ज्योती कलानी यांनी एक ध्वनिफीत ऐकवली. या ध्वनिफितीमध्ये भाजपचे नगरसेवक राम पारवानी व बेकायदा बांधकाम करणाऱ्यांमधील संभाषण असल्याचे कलानी यांनी सांगितल्यामुळे खळबळ उडाली. तसेच नगरसेविका मीना आयलानी यांनी नदीपात्रात भराव टाकून बनवलेली कंपाउंड वॉल तोडण्याचा तहसीलदारांचा आदेश आयुक्तांनी जुमानला नसल्याचेही स्पष्ट केले.
आरक्षित असलेल्या भूखंडांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा आणि नगरसेविका ज्योती कलानी यांनी एक ध्वनीफित सभागृहाला ऐकवली. या ध्वनिफितीमध्ये भाजप नगरसेवक राम पारवानी आणि हरेश जग्यासी यांच्या आवाजात अनधिकृत बांधकामाबाबत झालेल्या व्यवहाराचे संभाषण असल्याचा दावा कलानी यांनी केला आहे. यावेळी भाजप नगरसेवक भ्रष्ट असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘पिंटो पार्क येथे उल्हास नदीत भिंत उभारली आहे, या जागेचा मालमत्ता कर नगरसेविका मीना आयलानी यांच्या माहेरच्या नावावर म्हणजे मीना सुंदरदास बठीजा यांच्या नावावर आहे. याबाबत प्रकाश तलरेजा यांनी पालिका आणि तहसीलदार यांना तक्रारही दिली होती.
तहसीलदार अमित सानप यांनी आयुक्तांना भिंत तोडून प्रवाह मोकळा करण्यास सांगितले होता. मात्र, अद्यापही कारवाई का करण्यात आली नाही,’ असा प्रश्नही कलानी यांनी उपस्थित केला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ज्योती कलनी यांनी नाराजी व्यक्त केली.
उपमहापौर आणि काँग्रेस नगरसेविकेत वादविवाद
काँग्रेस नगरसेविका जया साधवानी यांनी जनसंपर्क विभागातील भ्रष्टाचारासंबंधी स्थगन प्रस्ताव मांडला होता. तो महापौर आशा इदनानी यांनी स्वीकारावा यासाठी साधवानी यांनी आग्रह धरला होता. त्यावेळी उपमहापौर जमनादास पुरस्वानी यांनी त्यांनाच शांत बसण्यास सांगितले. त्यामुळे साधवानी आणि उपमहापौर पुरस्वानी यांच्यात खडाजंगी झाली. अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.