डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरावीत, असे पालिका प्रशासनाचे आदेश असूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
मुंबई- डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरावीत, असे पालिका प्रशासनाचे आदेश असूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पालिका तसेच उपनगरीय रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता असताना विविध विभागांतील २१७ रिक्त पदांपैकी केवळ ८४ पदे भरण्यात आली आहेत. तर उर्वरित १३३ पदे अद्याप रिक्त असल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. यासाठी प्रशासकीय उदासीनता आणि राजकीय नाकर्तेपणा कारणीभूत ठरत असल्याची तीव्र नाराजी सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
मुंबईत एकूण १८ उपनगरीय रुग्णालये आहेत. या रुग्णालयांतील औषध विभाग, बालरोगतज्ज्ञ, सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि एनेस्थेशिया विभाग अशा एकूण पाच विभागांतील बहुतांश पदे रिक्त आहेत. या सर्व रुग्णालयांतील मिळून २१७ जागा रिक्त आहेत. त्यातील फक्त ८४ जागांवर केवळ निवड करण्यात आली आहे. उर्वरित १३३ जागा अद्याप रिक्तच आहेत. या रुग्णालयांत काम करणा-या डॉक्टरांना दरमहा ७५,००० रुपये पगार दिला जातो. मात्र तरीही उपनगरीय रुग्णालयांत डॉक्टर वळताना दिसत नाही, असे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
वांद्रे येथील भाभा रुग्णालय, कुपर, सिद्धार्थ, भगवती रुग्णालय, कस्तुरबा क्रॉस रोड रुग्णालय, चेंबूरचे राजावाडी, विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालय व मुलुंड येथील एम. टी.अग्रवाल रुग्णालयात मोठय़ा प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, या रुग्णालयांत निवडक आजारांवरच उपचार केले जातात. परिणामी येथील रुग्णांना पालिकेच्या केईएम, नायर, शीव रुग्णालयाची वाट धरावी लागते.
उपनगरीय रुग्णालयांत अपु-या सोयीसुविधा आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्ण व नातेवाईकांचे हाल सुरूच आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी उपनगरीय रुग्णालयांत भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला होता. तशा प्रकारची जाहिरातही देण्यात आली होती. मात्र या भरती प्रक्रियेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
उपनगरीय रुग्णालयांतील रिक्त पदे
विभाग पदे भरलेल्या जागा रिक्त पदे
औषध ५३ २ ५१
बालरोगतज्ज्ञ ४१ २२ १९
शस्त्रक्रिया ४९ २२ २७
स्त्रीरोगतज्ज्ञ ३३ २१ १२
एनेस्थेशिया ४१ १७ २४
उपनगरीय रुग्णालयांत डॉक्टर भरती कंत्राट पद्धतीनुसार केली जाते. त्यामुळे रुग्णालयात कार्यरत असताना या डॉक्टरांना कोणत्याही सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. तसेच रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक साधनेही रुग्णालयात नसल्याने डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डॉक्टरांनारुग्णांसोबत मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. बहुतांश डॉक्टरांना मराठी बोलणे शक्य होत नाही. पालिका प्रशासनाने एका वर्षाच्या करारातून या गोष्टी वगळल्या तर मोठय़ा संख्येने डॉक्टर्स उपनगरीय रुग्णालयात काम करण्यासाठी पुढे येतील.
– डॉ. सागर मुंदडा, अध्यक्ष केंद्रीय मार्ड