पुण्यातील उपजिल्हाधिका-याच्या घरातून 1.79 कोटी रुपयांची संप्ती जप्त करण्यात आली आहे
पुणे – लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांच्या घरात २४ लाख २४ हजारांची रोकड, ३४ लाख रुपयांच्या एफडी, १० लाख रुपयांचे किसान विकासपत्र, सोन्या-चांदीचे दागिने आणि जमिनींचे दस्त असा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा ऐवज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केला आहे. दरम्यान, महाजन आणि त्यांचे लिपिक रणदिवे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १५ हजाराच्या जामिनावर सुटका केली. अटकेची कारवाई पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी दोघांना कोर्टात हजर करण्यात आले होते.
कूळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी महाजन आणि त्यांचे सहाय्यक लिपिक राजेश रणदिवे यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने बुधवारी रात्री अटक केली होती. महाजन यांनी घरातील वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेले २४ लाख २४ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. महाजन यांच्याकडे एसबीआय बँकेच्या ३४ लाख रुपयांच्या एफडीही सापडल्या आहेत. महाजन यांनी १० लाख रुपयांची किसान विकासपत्रही घेतल्याचे तपासात आढळले आहे.
घरातील कपाटात सोन्या-चांदीचे असे १६ लाख रुपयांचे दागिने सापडले आहेत. तसेच त्यांच्याकडे कोल्हापूर, करवीर, हवेली येथील जमिनींचे चार दस्त सापडलेले आहेत. खराडी येथे त्यांची दोन दुकानेही आहेत. याचबरोबर सहारा सिटी येथील एक दस्तही सापडला आहे, तो तुकाराम मुरकुटे यांच्या नावाचा आहे. त्यामुळे मुरकुटेकडेही तपास करण्यात येणार, अशी माहिती पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी दिली.
पोलिसांनी रणदिवे यांच्या येरवडयातील सरकारी निवासस्थानावरही छापा घातला. रणदिवे यांनी धानोरी येथे तिरुपती पॅराडाईज येथे नुकताच एक फ्लॅट खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी रणदिवे यांच्या सातारा येथील घरीही छापा घातला. मात्र, तेथे फारसा ऐवज मिळाला नाही.