नवरात्रीच्या काळात चालू असलेल्या तीन वेगवगेळ्या ठिकाणच्या मंडळांचे उपक्रम व त्यांचे महत्त्व सांगणा-या दुर्गा मंडळांची माहिती..
तुळशीवाडीमध्ये ” मुक्तादेवी” मातेचा उत्सव
ज्याप्रमाणे गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो त्याच प्रमाणे नवरात्रो उत्सव देखील मोठय़ा उत्साहात साजरा होताना दिसत आहे. शिवडी येथील तुळशीवाडी सेवा कमिटी दरवर्षी मुक्तादेवी मातेचा उत्सव साजरा करताना दिसते. या मातेचे वैशिष्टय़े म्हणजे, पुराणकाळातील दगडाच्या रूपात १९६३ साली तुळशीवाडी येथे मुक्तादेवी प्रकट झाली असे म्हणतात. तेव्हा या मुक्तादेवीचे मंदिर येथे उभारण्यात आले व त्यावर्षी तुळशीवाडी सेवा कमिटीची स्थापना झाली. १९६३ पासून ते २०१५ पर्यंत तुळशीवाडी सेवा कमिटीचे काम पुरुष पाहत होते. २०१६ पासून महिला या कमिटीचे कामकाज संभाळत आहेत. आपापली संसारिक जबाबदारी सांभाळत विभागातील विविध सामाजिक उपक्रमात या महिला सहभागी होताना दिसत आहेत. शोभा कणगुटकर गेली दोन वर्ष या मंडळाच्या अध्यक्ष आहेत. एकूण २५ महिला या मंडळाच्या सभासद आहेत. ज्याप्रमाणे नवरात्रो उत्सव या महिला मंडळात सांभाळत आहेत, त्याचप्रमाणे गणेश उत्सव, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन हे कार्यक्रम देखील महिला तितक्याच उत्साहात सांभाळताना दिसत आहेत. हे पूर्ण मंडळ सांभाळताना त्यांना तरुण वर्गाप्रमाणे पुरुष मंडळींची सुद्धा तेवढीच मदत होते. नवरात्रीमध्ये देवीचा उत्सव, पूजा, हळदी-कुंकू, मंगळागौर, रास-गरबा असे अनेक कार्यक्रम इथे होतात.
स्थापनेपासून ते अध्यक्ष स्थानापर्यंतचा रंजक प्रवास..
आमच्या मंडळाची स्थापना ही १९६३ साली झाली तेव्हापासून ते २०१७ पर्यंत आधी एक सदस्य ते पुढे मंडळाचे अध्यक्ष पद हा प्रवास रंजक होता. ही जबाबदारी पार पाडताना घरातली कामे करता करता मंडळाचे काम संभाळताना देखील खूप चांगला असा अनुभव मिळतो. अनेक नवीन ओळखी होतात. तरुणांचा सहभाग आणि मदत अधिक होते.
– शोभा करगुटकर (तुळशीवाडी महिला कमिटी अध्यक्ष)
दिव्यातील जय अंबे माता उत्सव
दिव्यातील प्रसिद्ध नवरात्री मंडळ म्हणजे जय अंबे माता. मंडळाची स्थापना ही एकत्रिकरणाच्या उद्देशाने झाली. मंडळाचे संस्थापक तुकाराम सत्यवान मुंडे, अध्यक्ष नयन तुकाराम मुंडे आहेत. महिला अध्यक्ष प्रिया ठाकूर आहेत. मंडळाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. या मंडळाअंतर्गत गरबा, नेत्रदान शिबीर व रक्तदान शिबीर राबवले जाते. तसेच लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात.
या मंडळाची खासियत म्हणजे गरबा. महिलांनी गरब्याला येताना आपले पूर्ण अंग झाकतील असे कपडे घालावे. दुसरा नियम म्हणजे इथे फोटो व व्हीडिओ काढणे यावर बंदी आहे. मंगळागौरी हा विशेष कार्यक्रम बसवला जातो. आपल्या महिलांची व मुलांची बाहेर जाऊन अवहेलना होऊ नये तसेच बाहेरच्या मुलींची इथे येऊन अवहेलना होऊ नये याची विशेष काळजी जय अंबे माता मंडळ घेत आहे.
गरबा खेळा पण नियम पाळा..
गरब्यात सुरू असणारे गैरप्रकार टाळावे त्यासाठी नियमांचे पालन करतो. कारण गरब्याच्या नावाखाली खूप ठिकाणी खेळ चालतो व यामुळे अनेक स्त्रियांचे बळी जातात. त्यामुळे आम्ही जे नियम पाळतो याचे अनुकरण इतर मंडळांनी करावे. हे महिलांचे खच्चीकरण नसून त्यांची सुरक्षा आहे.
– तुकाराम सत्यवान मुंडे. जय अंबे माता, संस्थापक
यशोधनचे दुर्गादेवी महिला मंडळ
ठाण्यातील यशोधन नगरमधील दुर्गादेवी मंडळ सुद्धा अशाच जल्लोषात देवीची मनोभावे आराधना करत आहे. आपल्या विभागात देखील नवरात्रीत देवीची स्थापना व्हावी, तसेच आपल्या हातून सुद्धा देवीची सेवा व्हावी तसेच विभागातले वातावरण चांगले राहावे म्हणून या दुर्गादेवी मंडळाची स्थापना केली. या मंडळाचे हे सहावे वर्ष आहे. या मंडळाच्या अध्यक्ष गेले दोन वर्ष संपदा पांचाळ या आहेत तर संस्थापक जॉर्ज बंडू आहेत. पूजा,
हळदीकुंकू कार्यक्रम तसेच आरती स्पर्धा, देवीचा होम, महाप्रसाद, गरबा असे उपक्रम असतातच त्याप्रमाणे या मंडळातील रास गरब्याचे वैशिष्टय़े म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळी थीम ठरवण्यात येते जसे की, टाय डे-साडी डे, कपल डे, फॅन्सी ड्रेस, ट्रेडिशनल डे, ब्लँक अॅण्ड वाइट डे अशा अनेक थीम ठरविल्या जातात. प्रत्येक गरबाप्रेमी तसा पेहराव करून येतो व गरब्याचा आनंद लुटतो.
संस्कृतीची ओळख..
गेले तीन वर्ष मी या मंडळाची अध्यक्ष आहे. नवरात्री उत्सव हा आपला धार्मिक उत्सव आहे. तर तुळजाभवानी ही आपल्या महाराष्ट्राची तुळजाभवानी आहे. विभागामध्ये नवरात्री उत्सव साजरे करण्याचे कारण येवढेच की जनजागृती होते तसेच लहाना मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती मिळते आणि हे उत्सव साजरे करताना आताच्या काळात देखील लोकांचा धार्मिक संस्कृतीकडे कल आहे हे दिसून येते.
– संपदा पांचाळ (दुर्गादेवी महिला मंडळ अध्यक्ष)