तांत्रिक आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक हाती घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
मुंबई –तांत्रिक आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक हाती घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे कल्याण आणि ठाणे दरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 4 पर्यंत अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेणार आहे. यामुळे कल्याणहून सुटणा-या सर्व अप जलद लोकल अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार असून, त्या कल्याण ते ठाणेपर्यंत सर्व स्थानकात थांबतील.
हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला डाउन मार्गावर आणि वडाळा रोड ते वांद्रे दरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. यामुळे सकाळी 10.52 ते दुपारी 3.55 पर्यंत सीएसटीहून पनवेलच्या दिशेने सुटणा-या लोकल सीएसटी ते कुर्लादरम्यान मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून धावतील आणि कुल्र्यानंतर डाउन हार्बर मार्गावर वळवण्यात येतील.
सकाळी 10.48 ते दुपारी 4.04 पर्यंत सीएसटीहून वांद्रे, अंधेरीसाठी सुटणा-या आणि सकाळी 10.40 ते सायंकाळी 3.45 पर्यंत वांद्रे आणि अंधेरीहून सीएसटीसाठी सुटणा-या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. वांद्रे आणि अंधेरी या हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायं. 6पर्यंत मुख्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गाने प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेचा जंबो ब्लॉक
सकाळी 10.35 ते दुपारी 3.35पर्यंत बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाउन धिम्या मार्गावर पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळेत अप आणि डाउन धिम्या मार्गावरील सर्व लोकल बोरिवली ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावरून धावणार आहेत.