रणजी विजेत्या कर्नाटकने बुधवारी चौथ्याच दिवशी इराणी करंडकावर शिक्कामोर्तब करत यंदाच्या देशांतर्गत हंगामाची सुवर्णाक्षरांत नोंद केली.
बंगळूरु – रणजी विजेत्या कर्नाटकने बुधवारी चौथ्याच दिवशी इराणी करंडकावर शिक्कामोर्तब करत यंदाच्या देशांतर्गत हंगामाची सुवर्णाक्षरांत नोंद केली. लेगस्पिनर श्रेयस गोपालच्या हॅटट्रिकमुळे शेष भारताला १८३ धावांत गुंडाळताना यजमानांनी एक डाव आणि २२२ धावांनी दणदणीत विजय नोंदवता आला.
गेल्या ९ हंगामांमध्ये इराणी करंडक जिंकणारा कर्नाटक हा एकमेव रणजी विजेता संघ आहे. पाचव्यांदा कर्नाटकला इराणी स्पर्धा जिंकता आली. ३ बाद ११४ धावांवरून पुढे खेळणा-या शेष भारताला डावाने पराभव टाळण्यासाठी २९१ धावांची गरज होती. मात्र फॉर्मात असलेला कर्णधार विनय कुमारने भरवशाचा दिनेश कार्तिक (२७) आणि मनदीप सिंगला (२) एकाच षटकात बाद करत पाहुण्यांचा डावाने पराभव निश्चित केला.
शेवटच्या पाच फलंदाजांना दोन आकडी धावा गाठता आल्या नाहीत. केवळ बाबा अपराजितने (६६) चांगली झुंज दिली. अपराजितपाठोपाठ अशोक िडडा आणि पंकज सिंगला त्रिफळाचीत श्रेयस गोपालने करत हॅटट्रिक नोंदवली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो कर्नाटकचा आठवा गोलंदाज ठरला. हॅटट्रिकसह डावात पाच विकेट त्याने घेतल्या. पहिल्या डावात सहा विकेट घेणारा आर. विनय कुमारने दुस-या डावात चार विकेट घेत सामन्यात १० विकेट घेण्याची करामत साधली
विनय कुमारला ‘बर्थडे गिफ्ट’
कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारचा बुधवारी ३१वा वाढदिवसही होता. ते पाहता इराणी करंडक उंचावत त्याने वाढदिवस साजरा केला. रणजी आणि इराणी करंडक जिंकून देणारा तो कर्नाटकचा तिसरा कर्णधार ठरला. ‘‘गेली १५ वर्षे कर्नाटक इराणी करंडक पटकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कर्नाटकचा क्रिकेटपटू म्हणून मीदेखील गेली १० वर्षे या क्षणाची वाट पाहत होतो,’’ असे विनयने म्हटले.
देशांतर्गत लढतींकडे प्रेक्षकांची पाठ
घरच्या संघाचे कौतुक करायला एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मोजून ५० प्रेक्षक उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : कर्नाटक – ६०६ (बिन्नी १२२, गौतम १२२, पंकज १२२-६) विजयी वि. शेष भारत २०१ आणि १८३ (अपराजित ६६, गोपाळ ३५-५, विनय कुमार ७०-४), निकाल : कर्नाटक एक डाव आणि १२२ धावांनी विजयी.
सामनावीर : आर. विनय कुमार.