पश्चिम आफ्रिकेत थैमान घालणा-या इबोलाचा प्रकोप काही केल्या कमी होत नाही.
संयुक्त राष्ट्रे – पश्चिम आफ्रिकेत थैमान घालणा-या इबोलाचा प्रकोप काही केल्या कमी होत नाही. या आजाराने आतापर्यंत २२०० जणांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक बोलवली आहे.
आफ्रिकेतील गिनिया, लायबेरिया, नायजेरिया आणि सिएरा लिऑन आदी देशांमध्ये इबोलाचा कहर आहे. या भागात ४ हजार रुग्ण आढळले आहेत. या आजाराचा मुकाबला करण्यासाठी आफ्रिकेतील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून तातडीने मदत देणे गरजेचे आहे. अन्यथा या आजाराने आणखी बळी जाण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत समांथा पॉवर यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत संयुक्त राष्ट्रांची बैठक बोलवावी, अशी मागणी अमेरिकेने केली होती. त्यावरून संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून आणि वरिष्ठ अधिका-यांनी बैठक बोलवली.
या संसर्गजन्य आजाराला कसे रोखावे यावर परिषदेत चर्चा होणार आहे. या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे पॉवर म्हणाल्या.हा आजार नियंत्रण आणण्याजोगा आहे. तसेच त्याच्यावर उपचार होऊ शकतात. या आजाराचा रुग्ण बचावला जाऊ शकतो. आफ्रिकेबाहेर हा आजार पसरल्यास त्याचे परिणाम आर्थिक, सुरक्षेबाबत होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.लायबेरियात ३१ डिसेंबपर्यंत संयुक्त राष्ट्रांमार्फत काम करण्यात येणार आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरची गरज भासत आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून मदत मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.