डेट फंडांमधून कमी परतावा मिळेल, या आशेने इन्फोसिसने गेल्या तीन महिन्यांमध्ये डेट फंडातील आपली ५६०० कोटींची गुंतवणूक कमी केली आहे.
नवी दिल्ली- शेअर बाजारातील मंदीच्या झळा म्युच्युअल फंड बाजारालाही बसू लागल्या आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये डेट फंडांमधून कमी परतावा मिळेल, या आशेने इन्फोसिसने गेल्या तीन महिन्यांमध्ये डेट फंडातील आपली ५६०० कोटींची गुंतवणूक कमी केली आहे.
देशातील दुसरी मोठी आयटी निर्यातदार कंपनी असलेल्या इन्फोसिसने डेट फंडांमध्ये २०१२ मध्ये मोठी गुंतवणूक केली. डिसेंबरच्या अखेरीस कंपनीची डेट फंडांमध्ये ७,३६५ कोटींची गुंतवणूक होती. तर मार्चच्या अखेरीस यातील गुंतवणुकीचा आकडा १,७३९ कोटींपर्यंत खाली आला आहे. कंपनीने जानेवारी ते मार्च या तिमाहीत डेट फंडातून ५६०० कोटी काढून घेतले आहेत.
लिक्विड फंडांमधील परतावा कमी झाला आहे. या फंडांमध्ये जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत गुंतवणूक करणे चांगले आहे. गुंतवणुकीवर कमी परतावा मिळत असल्याने यातील गुंतवणूक कमी करण्यास कंपनीचे संचालक व्ही. बालकृष्णन यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मोठया प्रमाणात कमी केली असून ती ३२ हजार कोटींवर आली आहे.