इंडोनेशियामधील लोम्बोक बेटाला बसलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यात ८२ जणांचा मृत्यू झाला असून १००हून अधिक जण जखमी झाले आहेत.
जकार्ता- इंडोनेशियामधील लोम्बोक बेटाला बसलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यात ८२ जणांचा मृत्यू झाला असून १००हून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.९रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली. भूकंपामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू लोम्बोकच्या उत्तर भागातल्या जमिनीच्या १०.५ किलोमीटर खोलवर आहे. या भूकंपाचे धक्के पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बाली द्विपसमूहापर्यंत जाणवले असून या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या परिसरात त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक तसेच पर्यटकांमध्ये भीतीचे वातावारण निर्माण झाले होते. परंतु त्सुनामीचा धोका टळला असल्याचे तेथील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
गेल्या आठवड्यात याच परिसरात झालेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.