इंग्लंडवर २-१ असा निसटता विजय मिळवत जपानने महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली.
एडमॉन्टन/कॅनडा- इंग्लंडवर २-१ असा निसटता विजय मिळवत जपानने महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. बचावपटू लॉरा बॅसेटचा ‘स्वयंगोल’ गतविजेत्यांच्या पथ्थ्यावर पडला. त्यांनी सलग दुस-या खेपेस ‘फायनल’मध्ये प्रवेश केला.
उपांत्य फेरीत गुरुवारी अतिरिक्त वेळेत १-१ अशी बरोबरी राहिल्याने ‘पेनल्टी शूटआऊट’द्वारे कोंडी फुटेल, असे वाटत होते. मात्र अतिरिक्त वेळेच्या दुस-याच मिनिटाला बॅसेटने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू धाडत इंग्लंडला पिछाडीवर नेले.
उर्वरित वेळेत आघाडी राखताना जपानने जेतेपद राखण्यादृष्टीने आणखी एक पाऊल टाकले. सामना संपल्यानंतर बॅसेटला अश्रू आवरता आले नाहीत. प्रशिक्षक मार्क सिम्पसन यांनी तिला सावरले. इंग्लंडचे अन्य फुटबॉलपटूही प्रचंड निराश दिसले.
तत्पूर्वी, ३३व्या मिनिटाला कर्णधार अया मियामाने जपानचे खाते उघडले. मात्र त्यांची आघाडी केवळ सात मिनिटे टिकली. मध्यंतराला पाच मिनिटे शिल्लक असताना मिळालेल्या ‘पेनल्टी किक’वर फारा विल्यम्सने इंग्लंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. दुस-या सत्रात आघाडी घेण्यात दोन्ही संघांना अपयश आले.
मागील खेपेस (जर्मनी, २०११) जपानने पहिल्यांदा जगज्जेतेपद पटकावले तरी गटवार साखळीत इंग्लंडकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. आशियाई विजेत्या जपानने त्याची परतफेड यंदा उपांत्य फेरीत केली. व्हँकुवरमध्ये रंगणा-या अंतिम फेरीत रविवारी (५ जुलै) गतविजेत्या जपानसमोर अमेरिकेचे आव्हान आहे. तिस-या स्थानासाठी दोन वेळचा विजेता जर्मनी इंग्लंडशी झुंजेल.