आकाशकंदील, पणत्या, दिवे, तोरणं आणि विविध प्रकारच्या गिफ्ट्सनी बाजारपेठा फुलल्या आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी सध्या बाजारात काय ट्रेंड आहेत हे जरा पाहूया.
दिवाळी हा सण दिव्यांचा. घराघरांत दिवाळी साजरी केली जाते. आकाशकंदील, पणत्यांचे विविध प्रकार, तोरणं, रांगोळीचे स्टीकर, आणखी काही घरातली सजावट.. भाऊबीज-पाडवा या दिवसांच्या निमित्ताने काही भेटवस्तुंची देवाण-घेवाण होते. अशी सगळीच खरेदी करायला एव्हाना तुम्ही बाहेर पडला असालच. या सगळ्या गर्दीत काय घेऊ आणि काय नको असं होऊन जातं. पण ही खरेदी काहीशी सोपी व्हावी म्हणून बाजारात काय नवीन ट्रेंड्स आले आहेत याची खास तुमच्यासाठी माहिती.
कंदील
दरवर्षी बाजारात दिसणारे चिनी पद्धतीचे गोल आकाराचे कंदील यंदा मात्र फारसे आढळत नाही. त्याची जागा षट्कोनी आणि चांदणीच्या कंदिलांनी घेतली आहे. चांदण्यांच्या कंदिलांमध्ये विविध रंगांचा वापर करण्यात आला आहे. पंचरंगी रंगांचे हे कंदील खूपच छान दिसतात. तसंच त्यात भरपूर छिद्रांची डिझाइन केली आहे. त्यामुळे छिद्र आणि रंग यांचा सुंदर मेळ घातल्याने हे कंदील आपलं लक्ष वेधून घेतात. याशिवाय नेहमीचे कागदी किंवा कापडी कंदीलही आहेत. कापडी कंदिलांमध्ये बांधणीच्या कापडाचे कंदील खूप छान दिसतात. याची किंमत ५५० रुपये आहे. याशिवाय नेहमीचे करंजीचे लहान आकाराचे कंदील अगदी १५० ते दोनशे रुपयांपासून उपलब्ध आहेत. कंदिलात आणखी एक आकर्षणाचा भाग म्हणजे छोटे छोटे कंदील. हे कंदील सजावटीत भरच घालतात. त्यातही भरपूर प्रकार पाहायला मिळतात.
दिवे
दिवाळीला एका कोप-यात एका बाऊलमध्ये मेणाचे दिवे ठेवण्याचा ट्रेंड पाच-सहा वर्षापासून जोर धरू लागला आहे. अॅल्युमिनिअमच्या लहान वाटयांच्या पारंपरिक दिव्यांबरोबरच केवळ मेणाचे एखाद्या गोळ्याप्रमाणे दिसणारे दिवेदेखील बाजारात आले आहेत. याची किंमत दहा रुपये एक याप्रमाणे आहे. हे दिवे रंगीत असल्याने ते खूपच खुलून दिसतात. आणि पूर्णत: रंगीत असल्याने ते दीर्घकाळ टिकतात.
पणत्या
सुपारीएवढया आकाराच्या पणतीपासून गोल, लांबट, चौकोनी, मटक्याच्या आकाराच्या, लाल, हिरव्या, पिवळ्या, गुलाबी, सोनेरी, चंदेरी अशा कितीतरी आकर्षक रंगातल्या पणत्या आपल्याला बाजारात पाहायाला मिळतात. इतकंच नाही तर रांगोळीच्या बाजूला ठेवण्यासाठी आकर्षक रंगांमधील दिवेदेखील आहेत. या पणत्यांची किंमत पंधरा-वीस रुपयांपासून ते दीडशे-दोनशे रुपयांपर्यंत आहे. मडक्याच्या आकाराच्या आकर्षक पणत्यादेखील त्यांच्या आकारामुळे आपलं लक्ष वेधून घेतात. या चार पणत्यांची किंमत चाळीस रुपये इतकी आहे.
तोरणे
सोनेरी कागदाच्या तोरणांपासून ते पार कवडयांच्या तोरणांपर्यंत सगळ्या प्रकारची तोरणं बाजारात उपलब्ध आहेत. सोनेरी रंगाच्या तोरणामुळे घराला पारंपरिक लुक मिळतो. ही तोरणं तुमच्या बजेटमध्ये म्हणजे अगदी शंभर रुपयांना उपलब्ध आहेत. लोकरीच्या तोरणांमध्ये वेगवेगळ्या रंगांची भरपूर रंगसंगती पाहायला मिळेल. या लोकरीच्या तोरणांची किंमत दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत आहे. कवडयांची आणि कुंदनांच्या तोरणांमध्ये मॉडर्न आणि पारंपरिक लुकचं फ्युजन पाहायला मिळतं. त्यामुळे ती सुंदर दिसतात. त्यांची किंमत साडे तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत आहे.
स्टीकर्स
दिवाळीच्या निमित्ताने शुभ लाभ, स्वस्तिक, लक्ष्पावलं या पारंपरिक चिन्हांची भरपूर विक्री होते. त्याचबरोबर कित्येक जण घरात रांगोळीचे कायमस्वरुपी स्टीकर चिकटवतात. त्यामुळे हे स्टीकर्सही बाजारात या दिवसांत पावलोपावली पाहायला मिळतात. पाच ते दहा रुपयांपासून या गोष्टी उपलब्ध आहेत.
पडदे
सध्या नेहमीच्या पारंपरिक पडद्यांपेक्षा आरसे किंवा शंख शिंपल्यांच्या पडद्यांना जास्त मागणी आहे. याचबरोबर काहीसे पारदर्शक पडदेदेखील घराची शोभा वाढवतात. याशिवाय पारंपरिक पडदेदेखील आहेतच. त्यातही भरपूर रंग आणि डिझाइन उपलब्ध आहेत. पण या दिवाळीच्या निमित्ताने घराला हटके लुक द्यायचा असेल तर काही वेगळे पडदे लावून बघायला काय हरकत आहे. याची किंमत तीनशे रुपयांना डझन अशी असते. मात्र हे पडदे दिसायला सुंदर दिसत असले तरी सांभाळायला खूपच नाजूक असतात.
गिफ्ट्स काय द्याल?
पाडवा आणि भाऊबीज म्हणजे प्रेमाचा, आपुलकीचा दिवस. पती-पत्नी आणि बहीण-भाऊ आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना काही वस्तू भेट म्हणून देतात. दरवर्षी काहीतरी वेगळं देण्याकडे एकमेकांचा कल असतो. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं नसलं तरी तुम्ही सध्या काय देऊ शकाल याची थोडक्यात माहिती.
गॅझेट्स
तुमचं बजेट थोडं मोठं असेल तर आता मोबाईल किंवा टॅब गिफ्ट म्हणून देणं ही खूप मोठी गोष्ट राहिलेली नाही. या सणासुदीच्या निमित्ताने एकमेकांना अगदी सहज या वस्तू दिल्या जातात. तसंच या दिवसांत अशा वस्तूंवर भरपूर गिफ्ट्सदेखील असतात. केवळ गिफ्ट्स नव्हेत तर इएमआयच्या किमतीतही कित्येकदा सवलती असतात.
चॉकलेट्स
बहीण-भावाच्या प्रेमाचा दिवस अधिक आणखी गोड करण्यासाठी चॉकलेट्सच्या गिफ्टचादेखील उत्तम पर्याय आहे. त्यात लहान पॅकिंगपासून मोठया पॅकिंगपर्यंत विविध प्रकारच्या चॉकलेट्सचा बॉक्स पाहायला मिळतो. यात तुम्हाला काही वेगळं द्यायचं असेल तर चॉकलेट्सचे बुकेही बाजारात मिळतात. ते काहीशे महागडे नक्कीच असतात. पण ते मिळाल्यावर तुमच्या बहिणीच्या किंवा भावाच्या चेह-यावरचा आनंद काही वेगळाच असतो.
फोटोफ्रेम
आपल्या प्रेमाचा दिवस आणखी गोड करायचा असेल तर काहीतरी हटके करायला हवं. एखाद्या फोटो स्टुडिओमध्ये जाऊन तुमच्या आठवणीच्या फोटोंचे कोलाज तयार करा. हे कोलाज एखाद्या सुंदर फ्रेममध्ये बसवून ते त्यांना गिफ्ट म्हणून द्या. आणि पाहा बरं त्यांच्या चेह-यावर कसा आनंद पसरेल.
कपडे
सगळ्यात शेवटी नेहमीच्या साडी किंवा ड्रेस हे नेहमीचे ऑप्शन आहेत. पण या शिवाय तुम्ही ड्रेसमटेरियल्स किंवा आजकाल बाजारात भरपूर व्हरायटीचे हटके कुडते आले आहेत ते देऊ शकता. पुरुषांच्या टी-शर्ट किंवा शर्टावर तर ‘बाय वन गेट वन फ्री’ यासारख्या ऑफर्सही असतात. एकापेक्षा अधिक जणांसाठी घ्यायचे असतील तर हा पर्याय खूप उत्तम ठरू शकतो. पुरुषांसाठी सद-यांचादेखील छान पर्याय आहे.