आलिया भट्टचं जीके कसंही का असेना! पण बाई आपल्या चित्रपट कारकीर्दीबाबत मात्र खूपच सजग आहे बरं का?
आलिया भट्टचं जीके कसंही का असेना! पण बाई आपल्या चित्रपट कारकीर्दीबाबत मात्र खूपच सजग आहे बरं का? या बेभरोशाच्या व्यवसायात कधी कोण कसं आपल्या पुढे जाईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे तिला थोडं असुरक्षित वाटतं खरं, आणि त्यामुळेच ती आपल्या समकालिन अभिनेत्री आणि चित्रपट व्यवसायावर नजर ठेवून आहे.
तिची खास नजर आहे ती, परिणीती चोप्रा, श्रद्धा आणि सोनम कपूरवर! इतकंच काय कीर्ती सेननवरही ती चांगली नजर ठेवून आहे. तिने बापडीने तर आतापर्यंत केवळ एकच चित्रपट केला आहे. पण तिच्याही प्रोजेक्ट्सची माहिती आलिया ठेवून आहे. बॉलिवुड सूत्रांच्या मते, आलिया बॉलिवुडमधील प्रमुख निर्मात्यांच्या संपर्कात आहे. आणि त्यांच्याकडून तिला ही संपूर्ण माहिती मिळत असते.
तिकीट खिडकीवरील आकडेही तिला खूप महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे ती चित्रपट व्यवसायातील काही तज्ज्ञांच्याही संपर्कात असते. त्यामुळेच तिला चांगलं माहीत असतं की, तिच्या चित्रपटाने किती कमाई केली आहे ती! तिने एका टीव्ही शोत सांगितलं होतं की, या व्यवसायात तिला खूप असुरक्षित वाटतं म्हणून! आणि त्यासाठीच तिचा हा प्रपंच सुरू असतो.
मागील वर्षी आलियाचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते- हायवे, टू स्टेट्स आणि हम्प्टी शर्मा की दुल्हनिया! तिन्ही चित्रपट चांगले यशस्वी ठरले. यासाठी तिला काही पुरस्कारही मिळाले. या वर्षी मात्र तिच्याकडे एकच चित्रपट आहे, तो म्हणजे विकास बहलचा शानदार! पण तिने रणबीर कपूरसोबत अयान मुखर्जीचा एक चित्रपटही साइन केला आहे. खरं म्हटलं तर आलिया प्रोफेशनली खूप छान काम करत आहे. आणि त्यामुळे तिचे खूप सारे फॅन्सही निर्माण झाले आहेत. तिने स्वत:ला ब-यापैकी सिद्धही केलं आहे. पण तिच्या मनात असलेला इतरांविषयीचा आकस तिलाच मागे टाकता न झाला म्हणजे मिळवलं.