‘जिहाद’च्या नावाखाली जगभरात हिंसाचार माजवणा-या इस्लामिक स्टेट ‘इसिस’चा आर्थिक डोलारा कोसळल्याने दहशतवाद्यांच्या पगारावर कात्री चालवणे सुरू झाले आहे.
वॉशिग्टंन – ‘जिहाद’च्या नावाखाली जगभरात हिंसाचार माजवणा-या इस्लामिक स्टेट ‘इसिस’चा आर्थिक डोलारा कोसळल्याने दहशतवाद्यांच्या पगारावर कात्री चालवणे सुरू झाले आहे. येत्या काळात हातावर काही पैसे पडतील की नाही, अशा चिंतेने घेरलेल्या ‘इसिस’मधील अनेक जिहादींनी प्रतिस्पर्धी दहशतवादी गटांची वाट धरल्याने येत्या काळात ‘इसिस’ला मोठे भगदाड पडले आहे, असे अमेरिकेतील आघाडीचे दैनिक ‘वॉशिग्टंन पोस्ट’ने म्हटले आहे.
दहशतवाटी गटांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या आघाडीच्या विश्लेषकांनीही ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बिकट आर्थिक परिस्थितून जात असलेल्या ‘इसिस’ला सध्या दहशतवाद्यांना पगार देणेही अवघड होऊन बसले असून नवीन भरती प्रकियाही थांबली आहे. अशा अनेक कारणांमुळे ‘इसिस’मधील अनेक दहशतवाद्यांनी दुस-या दहशतवादी गटांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
२०१४ मध्ये इराक आणि सीरियाचा मोठा भूभाग ‘इसिस’ने आपल्या ताब्यात घेतला होता. हा भूभाग अमेरिकेचे पाठबळ असलेल्या कुर्दिश आणि अरब सैन्याने परत ‘इसिस’च्या ताब्यातून मिळवला आहे. यातून ‘इसिस’चे वर्चस्व हळूहळू कमी होत असल्याचे जेकब शापिरो या ‘इसिस’च्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. जेकब हे येथील प्रिन्स्टोन विद्यापीठात राज्यशास्त्र विषय शिकवतात.
आर्थिक समस्येने ग्रासलेल्या अनेक दहशतवाद्यांनी इतर दहशतवादी गटांमध्ये सहभागी होण्याची तयारी चालवल्याचे वीरा र्मिनोव्हा या सीरिया आणि इराकमधील दहशतवादी गटांचे अभ्यासकाचे म्हणणे आहे. सीरियात ‘इसिस’मधील दहशतवाद्यांना जिहादमध्ये सामील होण्यासाठी मिळणारा पगार, भत्ते यावर कात्री चालवली जात असल्याने त्यांनी इतर दहशतवादी गटांची वाट धरल्याचे, मिनरेव्हा यांचे म्हणणे आहे.
‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी भरपूस पैसे मिळत असल्याने वर्षभरापूर्वी शेकडो दहशतवाद्यांनी ‘जिहाद’चा पुकारा करत ‘इसिस’ची वाट धरली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ‘इसिस’चे आर्थिक पतन सुरू झाले आहे. सीरियातील ४० तर इराकमधील २० टक्के भूभाग ‘इसिस’च्या ताब्यातून परत मिळवल्याचे अमेरिकन लष्कराचे म्हणणे आहे. अमेरिकेचे पाठबळ असलेल्या कुर्दिश आणि अरब सैन्याने ‘इसिस’चे सीरियातील तळ उद्ध्वस्त केले आहेत. हवाई हल्ले चढवताना ‘इसिस’चा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या तेलाच्या अड्डय़ांना निशाणा केला जात असल्याने ‘इसिस’चे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. या सर्व कारणांमुळे ‘इसिस’ला मोठा आर्थिक फटका बसत असून ‘इसिस’च्या दहशतवाद्यांना पगार आणि इतर सुविधा मिळणे कठीण होऊन बसले आहे.