मुंबईच्या रस्त्यांवर खुलेआम सुरू असलेल्या गुंडांमधील गँगवार आता तुरुंगातही घडू लागले आहे.
मुंबई- मुंबईच्या रस्त्यांवर खुलेआम सुरू असलेल्या गुंडांमधील गँगवार आता तुरुंगातही घडू लागले आहे. ऑर्थर रोड तुरुंगात सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास राडा होऊन कैद्यांनी एकमेकांना भोसकले.
तुरुंगातील बराक क्रमांक ७ मध्ये ही मारहाण झाली. यात पाच कैदी गंभीर जखमी झाले आहेत. त्या सर्वाना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून या प्रकरणी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑर्थर रोड तुरुंगात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास आग्रीपाडा येथून चोरीप्रकरणी सजा भोगत असलेले मुदस्सर इस्माईल अन्सारी, भायखळा, खारमधील चोरीतील आरोपी मकसूद खान आणि सुलेमान मेहमूद पटेल यांनी वडाळय़ातील खून प्रकरणातील आरोपी विशाल आमकर आणि मुरगन मनी नाडर यांच्या अल्युमिनियमच्या धारदार वस्तूने हल्ला केला.
यात आमकर आणि मुरगन मनी यांना भोसकण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. तर यात मुदस्सर याच्या डोक्याला मार लागला तर अन्य आरोपी संतोष परब हा जखमी झाला आहे. त्यामुळे या सर्व पाचही जखमी आरोपींना तुरुंग प्रशासनाने उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले.