इंग्लंडमध्ये अॅशेस मालिकेला सुरुवात व्हायला अवघे दोन आठवडे बाकी असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांची हकालपट्टी केली आहे.
मेलबर्न – इंग्लंडमध्ये अॅशेस मालिकेला सुरुवात व्हायला अवघे दोन आठवडे बाकी असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांची हकालपट्टी केली आहे. संघात शिस्तीचा अभाव दिसत असून कामगिरीतही सातत्य आणणे गरजेचे आहे, हे मुद्दे ध्यानात घेता आम्ही आर्थर यांना प्रशिक्षक पदावरून दूर करत आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले.
त्यांच्याजागी ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू डॅरेन लिमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१५च्या वर्ल्डकपपर्यंत लिमन यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
‘‘आर्थर यांना हटवण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. मात्र आम्हाला ऑस्ट्रेलियन संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित आहे. लिमन यांनी कमी कालावधीत क्विन्सलॅँड क्रिकेटला बुपा शेफिल्ड शिल्ड, रोबी वनडे कप आणि केएफसी टी-२० बिग बॅश लीग जिंकून दिली. ऑस्ट्रेलियाला तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पुन्हा अव्वल रॅँकिंग मिळवून देण्यासाठी लेहमन सर्वतोपरी योगदान देतील याची खात्री आहे,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य अधिकारी जेम्स सदरलॅँड यांनी स्पष्ट केले.
लिमन यांनी नुकत्याच संपलेल्या आयपीएल-६च्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचेही प्रशिक्षकपद भूषवले होते.