आर्ट सर्कल रत्नागिरीतर्फे सातव्या ‘कला व संगीत महोत्सवाचे’ आयोजन येथील थिबा राजवाडय़ाच्या प्रांगणात करण्यात आले असल्याची माहिती आर्ट सर्कलकडून आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
रत्नागिरी – आर्ट सर्कल रत्नागिरीतर्फे सातव्या ‘कला व संगीत महोत्सवाचे’ आयोजन येथील थिबा राजवाडय़ाच्या प्रांगणात करण्यात आले असल्याची माहिती आर्ट सर्कलकडून आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. २४ ते २६ जानेवारी या कालावधीत आयोजित या महोत्सवात पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. अजय चक्रवर्ती, उस्ताद शाहीर परवेझ, पं. अतुलकुमार उपाध्ये, शर्वरी जेमनीस या दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. दमदार गायन, सुरेल बासरीवादन, भान हरपून टाकायला लावणारे आणि नृत्याविष्कारातून संगीताचे आवर्तन घडवणा-या सातव्या कलासंगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे बासरीवादन तसेच आजच्या लोकप्रिय गायकांपैकी एक पं. अजय चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन हे सातव्या कला व संगीत महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. कला व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने हे दोन्ही महान कलाकार रत्नागिरीत प्रथमच येत असून या दोन्ही दिग्गजांच्या कलाविष्काराचा आनंद घेण्याची पर्वणी संगीत रत्नागिरीवासीय रसिकांना मिळणार आहे.
महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवार, २४ जानेवारी रोजी होणार आहे. पहिल्या दिवशी कला व संगीत महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. यानंतर कै. शंकरराव टेंगशे स्मृती शास्त्रीय संगीत सभेत पं. अजय चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन होईल. उद्घाटनाच्या दुस-या दिवशी शनिवारी सायंकाळी ६.३० वा. ठुमरी गायिका धनश्री पंडित राय यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर रात्री आठ वा. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन होईल.
या कार्यक्रमाला तबलासाथ पं. विजय घाटे तर बासरीची साथ विवेक सोनार देणार आहेत. रविवार २६ जानेवारीला महोत्सवाच्या सांगते दिवशी शर्वरी जमेनीस व सहका-यांचे शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांची व्हायोलियनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्यासोबत जुगलबंदी रंगणार आहे. या वेळी मुकेश जाधव तबलासाथ देतील. या तीन दिवसीय कार्यक्रमाचा लाभ रत्नागिरीकरांनी घ्यावा, असे आवाहन आर्ट सर्कल रत्नागिरीकडून करण्यात आले आहे.