देशातील पहिले रक्त संक्रमण प्रशिक्षण केंद्र नवी मुंबईतील खारघर येथे सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई – देशातील पहिले रक्त संक्रमण प्रशिक्षण केंद्र नवी मुंबईतील खारघर येथे सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रांत राज्यासह देशातील रक्त संक्रमण अधिकारी, तंत्रज्ञ, परिचारिका, समुपदेशक, रक्तदान शिबीर संयोजक, अन्न व औषध प्रशासन निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प राज्य सरकारने सोडला आहे.
रक्त संक्रमण परिषदेची बैठक गुरुवारी मंत्रालयात झाली. त्यावेळी या प्रशिक्षण केंद्राच्या तयारीबाबतचा आढावा आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी घेतला. शेट्टी म्हणाले की, रक्त संक्रमण विषयक प्रशिक्षण देणारे प्रशिक्षण केंद्र देशात कुठेही नाही. खारघर येथील सेंट्रल पार्क शेजारील दहा हजार चौरस फुटाच्या जागेवर हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून तेथे रक्तपेढी सुरू करण्यात येणार आहे.
या प्रकल्पात राज्यभरातील रक्तपेढय़ांत गोळा करण्यात येणारे रक्त रुग्णाला सुरक्षित देण्यापर्यंत प्रक्रियेच्या माहितीचे संगणकीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. ल्ब्युमिन, ग्लोब्युमिन फॅक्टर ८-९ हे रक्त घटक तयार करण्यासाठी फ्रॅक्शनेशन केंद्र व राज्यात तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशाप्रकारे रक्त जळीत रुग्ण, मूत्रपिंड विकाराचे रुग्ण, हिमोफिलीयाचे रुग्ण आदींसाठी लागणारे रक्त गरजूंना माफक दरात उपलब्ध होणार आहे.
राज्यात दरवर्षी संकलित होणा-या १ लाख लिटर प्लाझ्माचा वापर रक्त घटकांसाठी करण्यात येणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. राज्यात सध्या दोन जिल्ह्यात ब्लड ऑन कॉल योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवण्यात येत आहे. मुंबईसह राज्यात इतरत्र ही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अहमदनगर, अमरावती, गडचिरोली, औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, परभणी येथे या योजनेसाठी रक्त वाहतुक करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या जिल्ह्यात ‘ब्लड ऑन कॉल’ ही योजना सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, परभणी, सातारा, पुणे आदी दहा ठिकाणी ‘मेट्रो ब्लड बँकेचे’ काम अंतिम टप्प्यात असून तेथे अत्याधुनिकी यंत्रसामग्री बसवण्यात येत आहे. या मेट्रो बँकेमुळे स्वयंचलित रक्तगट तपासणी, विविध आजारांसाठीच्या रक्त तपासण्या स्वयंचलित पद्धतीने करण्यात येतील. रक्त पिशवी व नमुन्यासाठी बारकोड पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.