खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला असून खाकी हाफ पँटऐवजी संघाचे स्वयंसेवक आता तपकिरी रंगाच्या फूल पँटमध्ये दिसणार आहेत.
नागौर – खाकी हाफ पँट आणि पांढरा शर्ट अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला असून खाकी हाफ पँटऐवजी संघाचे स्वयंसेवक आता तपकिरी रंगाच्या फूल पँटमध्ये दिसणार आहेत.‘आरएसएसचे’ कार्यवाह भैयाजी जोशी यांनी रविवारी येथे आयोजित संघाच्या प्रतिनिधी सभेत ही घोषणा केली. जवळपास ९१ वर्षाहून अधिक काळ खाकी हाफ पँट ही संघाची ओळख होती.
संघाच्या गणवेशातून चामडय़ाच्या पट्टय़ाला काढून त्याऐवजी सिंथेटीक पट्टा निवडण्यात आला. मात्र काळी टोपी आणि पांढरा शर्ट कायम राहणार आहे.
स्वयंसेवक संघ काळानुसार बदल करणारी संघटना असून तपकिरी रंगाची पॅन्ट सगळीकडे उपलब्ध होऊ शकेल, यासाठी हा रंग निवडल्याचे जोशी यांनी सांगितले. हल्ली सर्वत्र फूल पँट वापरली जात असल्याने हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. तपकिरी फूल पँट वापरली तरी देशप्रेम जागवता येऊ शकते. फूल पँटमुळे थंडी, वारा, उन्ह, पाऊस कोणत्याही वातावरणात संरक्षण करणे शक्य आहे. तापकिरी रंगाची निवड करण्यामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संघशिस्तिीचा भाग म्हणून गेली ९० वर्ष हाफ पँट आरएसएसची ओळख होती. मात्र हाफ पँटमुळे अनेक संघ कार्यकर्त्यांची टर उडवली जायची. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी संघ शाखेकडे पाठ फिरवली होती. संघ विचारधारेला विरोध करणा-या अनेक जणांनी हाफ पँट हा थट्टेचा विषय बनवला होता. या सर्व गोष्टींचा विचार करून गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे भय्याजी जोशी यांनी सांगितले. २०१० साली गणवेश बदलण्यासंदर्भातील प्रस्ताव आला होता. मात्र यावर काही मार्ग निघाला नव्हता. पाच वर्षापर्यंत हा प्रस्ताव चच्रेत होता. मार्च २०१५ मध्ये हा प्रस्ताव पुन्हा आला होता. यापूर्वी तीन वेळा संघाचा गणवेश बदलल्याचे मनमोहन वैद्य यांनी यावेळी सांगितले.