अॅपलही आपला ऐतिहासिक आयफोनची सहावी आवृत्ती मोठ्या स्क्रीनमध्ये आणेल, असा अंदाज आयडीसी या आंतरराष्ट्रीय संस्थेने व्यक्त केला आहे.
न्यूयॉर्क– गेल्या वर्षात निराशाजनक कामगिरी करणा-या अॅपलने २०१४ मध्ये बाजारातील ट्रेंडनुसार बदलण्याचा विचार करत आहे. सध्या सुरू असलेल्या मोठ्या स्क्रीनची क्रेझ पाहून अॅपलही आपला ऐतिहासिक आयफोनची सहावी आवृत्ती मोठ्या स्क्रीनमध्ये आणेल, असा अंदाज आयडीसी या आंतरराष्ट्रीय संस्थेने व्यक्त केला आहे. तर टिव्टरवर ‘आयफोन ६’ची छायाचित्रे टाकण्यात आल्याने ‘आयफोन ६’ ची एंट्री नक्की मानली जात आहे.
अॅपलच्या ‘आयओएस’च्या विक्रीत ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ६.७ टक्क्यांचीच वाढ झाली. गेल्या वर्षभरात सॅमसंग आणि इतर कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेने अॅपलच्या विक्रीला फटका बसला असल्याचे आयडीसीने म्हटले आहे. अॅपलने २०१३ मध्ये ७९ कोटी ३६ लाख आयओएस या स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टमची विक्री केली. तर डिसेंबरच्या तिमाहीत पाच कोटी आयओएस स्मार्टफोन विक्री केले. आयओएसची मागणी जास्त असली तरी आयफोन महागडे असल्याने त्याचा विक्रीवर परिणाम होत असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे चालू वर्षात अॅपलकडून मोठ्या स्क्रीनचा आयफोन आणला जाईल, असा विश्वासही आयडीसीकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर चार इंचाचा आयफोनही कायम ठेवला जाईल, असेही संस्थेने म्हटले आहे.
जूनमध्ये होणा-या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये अॅपलकडून ‘आयफोन ६’ ला सादर केले जाण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. ‘आयफोन ६’ ला ४.७ इंचाची स्क्रीन असेल. त्यापाठोपाठ ५.७ इंचाची स्क्रीन असलेल्या आयफोनलाही बाजारात आणले जाण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन बाजारात आघाडी घेण्यासाठी अॅपलने बजेटमधील स्मार्टफोन किंवा मोठय़ा स्क्रीनचा आयफोन आणणे आवश्यक असल्याचे मत आयडीसी आपल्या अहवालात व्यक्त केले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोनही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमची स्मार्टफोन बाजारपेठेवर पकड असून त्यांचा ९५ टक्के हिस्सा आहे. यापुढेही या दोन्ही आपरेटिंग सिस्टममधील स्पर्धा तीव्र होणार असून चालू वर्षात एक अब्जाहून अधिक स्मार्टफोनची विक्री होण्याची शक्यताही आयडीसीकडून व्यक्त करण्यात आली आहे.