आयपीएल सातमधील दुस-या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सने हैदराबाद सनरायझर्सवर सात गडी राखून विजय मिळवला.
हैदराबाद- चुरशीच्या लढतीत हैदराबाद सनरायझर्सवर ७ विकेट आणि दोन चेंडू राखून मात करत कोलकाता नाइट रायडर्सने सोमवारी सातव्या हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला आणि अव्वल चार संघातील स्थान कायम ठेवले.
हैदराबादचे १४३ धावांचे आव्हान कोलकात्याने १९.४ षटकांत पार केले. कर्णधार गौतम गंभीर (६) लवकर परतला. मात्र सलामीवीर रॉबिन उथप्पाने (४०) सातत्य राखले. त्याच्यासह मनिष पांडे (३५), युसुफ पठाण (नाबाद ३९) आणि रायन टेन डोएशाते (नाबाद २५) यांनी फटकेबाजी करत कोलकात्याला एकूण सहावा विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, मध्यमगती उमेश यादवसह (२६-३) डावखुरा फिरकीपटू शाकीब-अल हसनच्या (२२-२) अचूक मा-यामुळे यजमान हैदराबादला ८ बाद १४२ धावा करता आल्या. नेतृत्वाची धुरा डॅरेन सॅमीकडे सोपवली तरी सलामीवीर शिखर धवनला (१९) मोठी खेळी करण्यास अपयश आले. त्यांच्या डावात सर्वाधिक धावा डेव्हिड वॉर्नरच्या (३४) होत्या. उमेशलाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
प्रो-कबड्डी लीगचा आज लिलाव
मुंबई – आगामी प्रोफेशनल (प्रो) कबड्डी लीगसाठीचा कबड्डीपटूंचा लिलाव मंगळवारी (२० मे) होत आहे. या लीगसाठी मुंबई आणि पुणे संघाचे नामकरण अनुक्रमे ‘यु मुंबा’ आणि ‘पुणेरी पलटण’ असे करण्यात आले आहे. या संघांत कोण स्थान पटकावते, याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.
बंगलोर संघाचे ‘बंगलोर बुल्स’, जयपूरच्या संघाला ‘जयपूर पिंक पँथर्स’, कोलकाता संघाला ‘बंगाल वॉरियर्स’ तसेच विशाखापट्टनम संघाचे ‘तेलुगु टायटन्स’ असे नाव ठेवण्यात आले आहे. पाटणा आणि दिल्ली संघांचे अद्याप नामकरण करण्यात आलेले नाही.
दरम्यान, मुंबईतील चार होतकरू कबड्डीपटूंना संधी मिळावी म्हणून श्रमिक जिमखान्यावर झालेल्या निवडचाचणी स्पर्धेत लोअर परळच्या विजय नवनाथ संघाने बाजी मारली. त्यांनी अंतिम फेरीत बीडीडी चाळीतील बंडय़ा मारूती संघाला हरवले. या चाचणीत शिवशक्ती संघही सहभागी झाला होता.