आयसीसी एलिट पॅनेलचे अंपायर्स तसेच अन्य पदाधिका-यांवरील ‘फिक्सिंग’च्या आरोपांत नाविन्य नसल्याचे माजी अंपायर डॅरेल हेयर यांनी म्हटले आहे.
मेलबर्न- आयसीसी एलिट पॅनेलचे अंपायर्स तसेच अन्य पदाधिका-यांवरील ‘फिक्सिंग’च्या आरोपांत नाविन्य नसल्याचे माजी अंपायर डॅरेल हेयर यांनी म्हटले आहे. आयपीएलला सुरुवात झाल्यापासून अंपायर्सनाही ‘फिक्स’ केले जात असल्याचे ऐकायला मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
श्रीलंका प्रिमियर लीग तसेच नुकत्याच संपलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपदरम्यान एका वृत्तवाहिनीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये सहा अंपायर्सनी ‘फिक्सिंग’ची तयारी दर्शवली. याची गंभीर दखल घेत आयसीसीने झाल्या प्रकाराची तातडीने चौकशी करण्याचे ठरवले आहे. त्यावर हेयर यांनी वरील प्रतिक्रिया ‘द ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेस’ दिली. ‘‘आयसीसीने चौकशी करण्यासाठी इतका वेळ का लावला, याचे आश्चर्य वाटते. संधी आणि लोभीपणामुळे असे प्रकार घडतात. तशा प्रकारची व्यक्ती असाल तर आपोआप तुम्ही त्यात ओढले जाता. अर्थात तिथे लोभीपणाची भावना अधिक असते,’’असे हेयर म्हणाले.
न्यू साउथ वेल्स क्रिकेटमध्ये कार्यरत असताना आयपीएलमध्ये ‘फिक्सिंग’सारख्या घटना घडत असतात, असे ऐकायला मिळाल्याचेही हेयर यांनी सांगितले.
‘‘आयपीएलमध्ये अंपायर्स तसेच अन्य पदाधिकारी ‘फिक्सिंग’सारखे प्रकार करतात, असे भारतीय उपखंडात कोचिंग करणा-या काहींकडून ऐकायला मिळाल्यावर आश्चर्य वाटले. मात्र वेगवेगळ्या भाषेत त्यांचा संवाद होत असल्याने कळणे कठीण होते. आयपीएलमधील काही सामने अपेक्षेप्रमाणे होतात. मात्र काही वेळा अचानक एखाद्या संघाची फलंदाजी गडगडते. प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी अचानक प्रभावी ठरते. जिंकण्याची हमखास संधी असूनही संघ हरतो, असे प्रकार घडलेत. त्यामुळे शंकेला वाव असतो,’’असे ते म्हणाले.
आपल्या कारकीर्दीदरम्यान अंपायर्स ‘फिक्स’मध्ये सहभागी असल्याचे ऐकायला मिळाल्याचे हेयर यांनी म्हटले. ‘‘माझ्या कारकीर्दीदरम्यान काही जणांनी पैसे घेऊन माहिती दिल्याचे तसेच काही निर्णय बदलल्याचे ऐकले. मात्र मनमोकळेपणाने सांगायचे तर ज्यांच्यासोबत मी ‘अंपायिरग’ केले. ते सर्व सहकारी सर्वोत्तम होते. मात्र पेशाशी इमान राखले. मात्र अन्य कुणाकडूनही ‘फिक्सिंग’ची शक्यता टाळता येत नाही,’’असे हेयर यानी सांगितले.
इंडिया टीव्हीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये पाकिस्तानचे नदीम घौरी आणि अनीस सिद्दिकी, बांगलादेशचे नादिर शाह तसेच श्रीलंकेच्या गामिनी दिसानायके, मॉरिस विन्स्टन आणि सागरा गालागे यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसह कौंटी आणि लीगमधील सामने ‘फिक्स’ करण्याची तयारी नादिर शाह यांनी दर्शवली.
भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही
नवी दिल्ली- पैसे घेऊन सामने ‘फिक्स’ करणा-या अंपायर्सची तातडीने चौकशी करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे आयसीसीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. ‘‘क्रिकेटपटू किंवा कुणी आयसीसी पदाधिकारी असला तरी ‘फिक्सिंग’ किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यास दुर्लक्ष केले जाणार नाही. ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये समावेश असलेल्या अंपायर्सचा टी-२० वर्ल्डकपच्या मुख्य स्पर्धेत समावेश नव्हता. भ्रष्टाचार केलेल्यांना कधीही माफ केले जाणार नाही. दोषींना शिक्षा होईलच,’’ असे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एकूण या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी इंडिया टीव्हीने योग्य ती माहिती पुरवावी, अशी सूचनाही आयसीसीने केली आहे.
बीसीसीआयची सबुरीची भूमिका
‘मॅचफिक्सिंग’मध्ये अंपायर्सचा सहभाग असल्याच्या ‘स्टिंग ऑपरेशन’बाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. ‘‘एकूण प्रकरणाची आयसीसीने दखल घेतली आहे. चौकशीनंतर ते योग्य ती कारवाई करतील,’’असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.
श्रीलंका, पाकिस्तान बोर्डाची चौकशीला सुरुवात
नवी दिल्ली / कोलंबो- टी-२० सामने ‘फिक्स’ करण्याबाबतच्या ‘स्टिंग ऑपरेशन’नंतर श्रीलंका आणि पाकिस्तान बोर्डाने चौकशीला सुरुवात केली आहे. ‘‘आयसीसीकडून अद्याप कुठलीही सूचना आली नसली तरी बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचा आयसीसीच्या चौकशी प्रक्रियेत समावेश असेल,’’असे श्रीलंका बोर्डाकडून सांगण्यात आले.