अभ्यासक्रमाची पुस्तके मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आयडॉलने ही पुस्तके सोमवार ते शनिवार दररोज सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) पदवी, पदव्युत्तर आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाची पुस्तके मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आयडॉलने ही पुस्तके सोमवार ते शनिवार दररोज सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना या वेळेत येऊन पुस्तके घेणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी रविवारीही खास सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आयडॉलमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात बीए, बीकॉम, बीएस्सी आदी पदवी आणि मराठी, हिंदी, राज्यशास्त्र, इंग्रजी, गुजराती आदी भाषांमध्ये पदव्युत्तर व विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सुमारे ८० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना आयडॉलकडून प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी लाखोंच्या संख्येने पुस्तके उपलब्ध करून द्यावी लागतात.
यंदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयडॉलने आपली प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपर्यंत सुरू ठेवली होती. यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना अद्यापही आपल्या अभ्यासक्रमांची पुस्तके आयडॉलमधे जाऊन घेता आली नाहीत.
आयडॉलमधून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे विविध ठिकाणी रोजगार आणि नोकरी सांभाळून असतात. यामुळे त्यांच्या वेळेत त्यांना अनेकदा ही पुस्तके येऊन घेण्यासाठी वेळ मिळत नाही. यासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये, यासाठी सकाळी सात वाजल्यापासून ही पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय आयडॉलने घेतला असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. ही माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळासोबतच आयडॉल आणि फोर्ट परिसरात लावण्यात आलेल्या डिजिटल सूचना फलकांवरही दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.