‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन’चे (आयआरसीटीसी) संकेतस्थळ हॅक झाल्याच्या वृत्तामुळे प्रवाशांत घबराट पसरली आहे.
मुंबई- ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन’चे (आयआरसीटीसी) संकेतस्थळ हॅक झाल्याच्या वृत्तामुळे प्रवाशांत घबराट पसरली आहे. मात्र हे संकेतस्थळ हॅक झाल्याबद्दल ‘आयआरसीटीसी’ने नकार दिला आहे.
संकेतस्थळ हॅक झाल्याच्या वृत्तात कितपत तथ्य आहे, याची सविस्तर माहिती घेण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून चार सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ती आपला अहवाल तयार करणार आहे.
ऑनलाईन तिकीट आरक्षित करण्यासाठी ‘आयआरसीटीसी’चे संकेतस्थळ लोकप्रिय आहे. तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना आपली वैयक्तिक माहिती द्यावी लागते. दररोज ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर लाखो तिकिटे आरक्षित होत असल्याने कोटय़वधींचा व्यवहार होतो. अशा परिस्थितीत संकेतस्थळ हॅक झाल्याच्या वृत्तामुळे प्रवाशांत चिंतेचे वातावरण आहे.
‘आयआरसीटीसी’चे संकेतस्थळ हॅक झाल्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे ‘आयआरसीटीसी’चे पश्चिम विभागाचे समूह मुख्य व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी सांगितले. इतर ई-कॉमर्स संकेतस्थळावर ज्याप्रमाणे माहिती भरली जाते तशीच माहिती ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर भरण्यात येते. त्याशिवाय कोणत्याही वापरकर्त्यांचे बँकेचे तपशील सव्र्हरवर ठेवत नसल्याचे मालखेडे यांनी सांगितले.
पॅनकार्डची माहिती किंवा इतर महत्त्वाची माहितीही या संकेतस्थळावर आवश्यक नसल्याने अतिमहत्त्वाची माहिती हॅकर्सकडे जाऊच शकत नाही, असा दावाही केला जात आहे. ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉम्रेशन सिस्टीम’ (क्रीस) आणि आयआरसीटीसी यांनी एकत्रित हॅकिंगबाबत चौकशी केली असता, संकेतस्थळ हॅक झाल्याची कोणतेही चिन्हे आढळून आली नसल्याचे सांगितले जात आहे.