वेंगुर्ले येथे ३, ४ व ५ जानेवारी रोजी ‘आम्ही वेंगुल्र्याचे’ पर्यटन महोत्सव २०१४ चे आयोजन करण्यात आले आहे.
वेंगुर्ले – येथे ३, ४ व ५ जानेवारी रोजी ‘आम्ही वेंगुल्र्याचे’ पर्यटन महोत्सव २०१४ चे आयोजन करण्यात आले आहे. फिश अँण्ड फूड फेस्टिव्हल, शॉपिंग बाजार, मजेची जत्रा, वेंगुर्ले व्हीजन २०२५, कृषी प्रदर्शन, ग्रामीण पर्यटन, ‘सी वर्ल्ड’ प्रदर्शन हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ असून महाराष्ट्रातील गाजलेला सांस्कृतिक कार्यक्रम व सेलिब्रेटींचा स्टेज शो या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
महोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक, कला व क्रीडा स्पर्धाचेही आयोजन केल्याची माहिती पत्रकार परिषदेत मनीष दळवी, महेंद्र मातोंडकर यांनी दिली. वेंगुर्ले येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तालुक्याला पर्यटनदृष्टय़ा अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात येणार असून वेंगुल्र्याची र्सवकष माहिती असणारे कॉफीटेबल बुक व स्वतंत्र वेबसाइट सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. महोत्सवादरम्यान वेंगुर्लेत पर्यटकांच्या सहली आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व हॉटेल, रिसॉर्ट व पर्यटन निवास न्याहारी केंद्रांशी संपर्क साधून येणा-या पर्यटकांना विशेष सवलतीचे दर लागू करण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. ‘सिंधुदुर्ग गाइड’ या संस्थेच्या सहकार्याने होणा-या या पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ ३ जानेवारी रोजी दुपारी भव्य शोभायात्रेने होणार असून पाच जानेवारीला सेलिब्रेटी शोने महोत्सवाची सांगता होणार आहे.
महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २०२५ मध्ये आपला वेंगुर्ला कसा असेल, याचे संकल्प मॉडेल मांडण्यात येणार आहे. तीन दिवसांचा हा मुख्य महोत्सव सर्वसामावेशक होण्यासाठी महोत्सवाच्या १० दिवस आधीपासून दररोज विविध प्रकारच्या कला, सांस्कृतिक व क्रीडाविषयक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्हास्तरीय पोस्टर्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, चित्ररथ स्पर्धा, रिक्षा स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, बैलगाडी सजावट स्पर्धा, पाककला व वेंगुर्ले मिनी मॅरॅथॉन आदी स्पर्धा जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या दुस-या दिवशी म्हणजे चार जानेवारीला खुली समूहनृत्य स्पर्धा व मिस वेंगुर्ले ही खुली सौंदर्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. पाच जानेवारीला सायं पाच वा. विवाहित महिलांसाठी ‘सौभाग्यवती वेंगुर्ले’ ही पैठणीचा खेळ रंगणारी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या १०० महिलांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
महोत्सवात शॉपिंग बाजार व फिश अँण्ड फूड फेस्टिव्हल आणि विविध प्रकारचे स्टॉल्स असणार असून ‘कारएस्पो’ आयोजन करण्यात येणार आहे. वेंगुर्लेतील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या समोरील मैदानात होणा-या या महोत्सवाच्या आयोजनासाठी ‘वेंगुर्ले पर्यटन महोत्सव समिती’ची स्थापना करण्यात आली असून या समितीतर्फे वेंगुर्ले पर्यटन महोत्सव भव्यदिव्य होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.