सेंच्युरिअन – सेंच्युरिअन कसोटीच्या पहिल्या दिवशी एडन माक्र्रम आणि डीन एल्गर जोडीने आफ्रिकेला भक्कम सुरुवात करून दिली. या सुरुवातीच्या जोरावर भारतावर वर्चस्व गाजवण्यात आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा यशस्वी झाला आहे. पहिल्या सत्रापर्यंत एल्गर आणि मार्क्रम जोडीने ७८ धावांची भागीदारी केली. पहिल्या सत्रात भारताच्या एकाही फलंदाजाला यश लाभलं नाही. मात्र दुस-या सत्राच्या सुरुवातीलाच आफ्रिकेचा हा आनंद फारकाळ टीकला नाही.
डीन एल्गरला माघारी धाडत रविचंद्रन आश्विनने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. मात्र यानंतरही हाशिम आमला आणि एडन माक्र्रम जोडीने आपल्या संघाचा डाव सावरत पुन्हा एकदा अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान माक्र्रमने भारतीय गोलंदाजीवर हल्लाबोल करत चौफेर फटकेबाजी केली. मात्र सेंच्युरिअनच्या मैदानावर शतक झळकावण्यासाठी अवघ्या ६ धावा हव्या असताना माक्र्रम यष्टीरक्षक पार्थिव पटेलकडे झेल देत माघारी परतला. आफ्रिकेचे २ गडी माघारी परतले असले तरीही सामन्यावर आपली छाप पाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले नाही.
चहापानाच्या सत्रानंतर आफ्रिकेने झटपट धावा जमवण्याच्या नादात आपल्या डावाची आक्रमक सुरुवात केली. मात्र याच प्रयत्नात एबी डिव्हीलियर्स इशांत शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यादरम्यान दोघांमध्येही अर्धशतकी भागीदारी झाली, यादरम्यान हाशिम आमलाने एका बाजूने संयमी अर्धशतक झळकावले. त्यामुळे उरलेल्या सत्रात भारताचे गोलंदाज काय कामगिरी करतात याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे.