आम आदमीचे सरकार म्हणून सत्तेत आलेल्या दिल्लीतील आप सरकारने हळूहळू खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली- आम आदमीचे सरकार म्हणून सत्तेत आलेल्या दिल्लीतील आप सरकारने हळूहळू खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे.
मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) नुकतीच दुपटीपेक्षा जास्त वाढ केल्यानंतर आता केजरीवालांच्या आप सरकारने सरकारच्या जाहिराती व प्रसिद्धीच्या खर्चासाठी तब्बल ५२६ कोटी रुपयांची तरतूद केल्याने दिल्लीकरांचे रक्त खवळले असून सर्वसामान्यांवर वाढीव कराचा बोजा लादून सरकार अशी उधळपट्टी करत असल्याने हेच का आम आदमीचे सरकार? असा प्रश्न सध्या दिल्लीकर विचारत आहेत.
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारने चालू आíथक वर्षात रेडिओवरून केल्या जाणा-या जाहिरातींसाठी ५२६ कोटींच्या रकमेची तरतूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत अरविंद केजरीवाल हेदेखील आता दिल्लीकरांशी ‘मन की बात’ करणार आहेत.
‘जो कहा, सो किया’ अशी या जाहिरात स्वरूपातील संवादात्मक कार्यक्रमाची टॅगलाईन असणार असून या माध्यमातून दिल्लीकरांना त्यांच्या असलेल्या सरकारने कोणकोणती कामे केली याची माहिती देण्यात येणार आहे. शिवाय सरकारची विविध धोरणे, जनतेच्या हिताचे निर्णय याबद्दलही संवाद साधला जाणार आहे. विशेष म्हणजे केजरीवाल सरकारच्या तुलनेत मागील वर्षी याच प्रसिद्धीसाठी अवघे २४ कोटी खर्च केले होते.
दरम्यान, हा पैसा सर्वसामान्य दिल्लीकरांनी सरकारला कराच्या रूपाने दिलेला घामाचा पैसा असून केजरीवाल सरकार करत असलेल्या त्या पैशाच्या उधळपट्टीवर दिल्लीतील विरोधी पक्षांनी मात्र तीव्र आक्षेप घेतला आहे. केजरीवाल नेहमी भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याच्या गोष्टी करतात, मात्र जनतेच्या घामाचा पैसा अशाप्रकारे स्वत:च्या सवंग प्रसिद्धीवर उडवणे, पायाभूत विकासाची तरतूद कमी करून स्वप्रसिद्धीसाठी पैसा खर्च करणे हा देखील एक प्रकारचा भ्रष्टाचारच असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी केली आहे. त्यामुळे केजरीवाल सरकार आता हा खर्च कमी करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.