पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी ‘आप’ नेते सोमनाथ भारती यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली- पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी दिल्लीचे माजी कायदामंत्री आणि आम आदमी पक्षाचे ‘आप’ नेते व मालवीया नगर येथील विद्यमान आमदार सोमनाथ भारती यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नी लिपिका मित्रा यांनी दिल्ली येथील द्वारका (उत्तर) पोलिस ठाण्यात सोमनाथ यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.
याप्रकरणी पोलिस ठाण्यातील महिला विभागाने प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने भारती यांच्या विरोधात भा. द. वि. कलम ३०७, ३२३ आणि ४९८ ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे द्वारका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
पाच वर्षांपासून सोमनाथ भारती छळ करत असल्याचा आरोप पत्नी लिपिका यांनी तक्रारीत केला आहे. ‘मी शारीरिक, मानसिक, मारहाण, शिवीगाळ आणि शाब्दिक हिंसाचाराची बळी ठरले आहे,’ असा आरोप लिपिका यांनी केला आहे. ‘मला आणि माझ्या मुलांना सोमनाथ त्रास देत असत, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच भारती आणि त्यांच्या सहका-यांकडून धमक्या देण्यात आल्याचेही भारती यांच्या पत्नी लिपिका यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सोमनाथ भारती यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने छळवणूक, मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने सोमनाथ यांना नोटीस बजावली होती.
सोमनाथ भारती यांचे २०१० साली लिपिका मित्रा यांच्यासोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर वर्षभरात आपल्यासोबत मारहाण केल्याचा आरोप लिपिका यांनी केला आहे.
लिपिका सध्या एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करत आहे. भारती यांनी आपल्याकडे हुंड्याची मागणी केल्याचेही लिपिका यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.