जगज्जेतेपदाच्या लढतीनंतर विश्वनाथन आनंद आणि अव्वल मानांकित नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हे गुरुवारपासून (३० जानेवारी) सुरू होणा-या झ्युरिच बुद्धिबळ चॅलेंज स्पर्धेतून आमनेसामने येणार आहेत.
झ्युरिच- जगज्जेतेपदाच्या लढतीनंतर विश्वनाथन आनंद आणि अव्वल मानांकित नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हे गुरुवारपासून (३० जानेवारी) सुरू होणा-या झ्युरिच बुद्धिबळ चॅलेंज स्पर्धेतून आमनेसामने येणार आहेत. जगज्जेतेपद गमावल्यानंतर आनंद प्रथमच क्लासिकल स्पर्धेत सहभागी होत आहे. कार्लसनदेखील नोव्हेंबरमध्ये जगज्जेतेपद पटकवल्यानंतर प्रथमच स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळणार आहे. थोडय़ा कालावधीनंतर कार्लसन खेळत असला तरी तोच जेतेपदाचा दावेदार मानण्यात येत आहे.
एकूण सहा ग्रॅँडमास्टरचा सहभाग असलेली ही पाच डावांचीच स्पर्धा आहे. स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी (२९ जानेवारी) ब्लिट्झ लढतीनंतर घोषित होणार होते. त्यातून आनंद-कार्लसन यांच्यातील लढत केव्हा आहे हे समजू शकेल. सहभागी बुद्धिबळपटूंना एकमेकांशी एकदाच आमनेसामने यावे लागेल. स्पर्धेचा समारोप रॅपिड लढतीद्वारे मंगळवारी (४ फेब्रुवारी) होईल.
आनंद आणि कार्लसनसह आर्मेनियाचा लेवॉन अरोनियान, इटलीचा फॅबियो कॅरुआना, अमेरिकेचा हिकॅरु नाकामुरा आणि इस्रयलचा बोरिस गेलफॅँड सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे पाचवेळा जगज्जेता ठरलेला आनंद प्रथमच सर्वात कमी रॅँकिंग असलेला बुद्धिबळपटू म्हणून सहभाग घेईल. जगज्जेतेपद गमावल्यानंतर आनंदचे लंडन बुद्धिबळ क्लासिक (रॅपिड प्रकार) स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपले. या अपयशामुळे आनंदची जागतिक रॅँकिंगमध्ये नवव्या स्थानी घसरण झाली. मार्चमध्ये आनंदला कॅँडिडेट्स स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. त्याची तयारी म्हणून त्याला झ्युरिचमधील स्पर्धा उपयुक्त ठरेल.
अन्य बुद्धिबळपटूंमध्ये अरोनियानने नुकतीच टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा जिंकून फॉर्म दाखवला. कॅरुआनाला गेल्या काही महिन्यांत मोठी स्पर्धा जिंकता आली नसली तरी तो एखादा धक्कादायक विजय नोंदवू शकतो. नाकामुराने मात्र टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली. २०१२मध्ये जगज्जेतेपदाच्या लढतीत आनंदचा आव्हानवीर असलेला गेलफॅँडलाही टाटा स्टील स्पर्धेत संयुक्तपणे शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले.