अलेखाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिस-या फेरीत मंगळवारी जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि आर्मेनियाचा लेवॉन अरोनियन यांच्यातील डावात ४१ चालींनंतर बरोबरी मान्य करण्यात आली.
पॅरिस- अलेखाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिस-या फेरीत मंगळवारी जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि आर्मेनियाचा लेवॉन अरोनियन यांच्यातील डावात ४१ चालींनंतर बरोबरी मान्य करण्यात आली. स्पर्धेत दुस-यांदा पांढरी मोहरी घेऊन खेळताना आनंदला पुन्हा एकदा विजयापासून मुकावे लागले. सोमवारीही आनंदला रशियाच्या निकिता विटियूगोवविरुद्ध दुस-या फेरीतील लढतीत ४० चालींमध्ये बरोबरी स्वीकारावी लागली होती.
स्पर्धेच्या दुस-या फेरीतील अन्य लढतींमध्ये इंग्लंडच्या मायकेल अॅडॅम्सने सलग दुसरा विजय नोंदवताना रशियाच्या पीटर स्विडलरला ३७ चालींमध्ये नमवले. याबरोबरच अॅडॅम्सने दोन गुणांसह आघाडी घेतली. माजी जगज्जेता रशियाचा व्लादिमिर क्रॅमनिक आणि आर्मेनियाचा लेवॉन अरोनियन यांच्यातील प्रतिष्ठित लढतीत अरोनियने दमदार विजय मिळवला. ५२ चालींमध्ये त्याने क्रॅमनिकला पराभव मान्य करायला लावला.
पहिल्या लढतीत अरोनियनला हरवणारा चीनचा युवा ग्रॅँडमास्टर डिंग लिरेनला फ्रान्सच्या मॅक्सिम वॅशियर-लॅग्रेवकडून ३९ चालींमध्ये पराभव स्वीकारावा लागला. अन्य लढतीत इस्रयलच्या बोरिस गेलफॅँडने फ्रान्सच्या लॉरेंट फ्रेसिनेटविरुद्धच्या डावात २६ चालींनंतरच बरोबरी मान्य केली.