आठव्या फेरीनंतर आनंद आणि अरोनियनचे प्रत्येकी पाच गुण झाले असून दोघेही संयुक्तरित्या अव्वल आहेत.
खँती मॅन्सिस्क (रशिया)- कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेतील आठवी फेरी लक्षात राहील. या फेरीत शनिवारी चारपैकी तीन लढती बरोबरीत सुटल्या. पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंदने सलग पाचवी बरोबरी साधली. आनंद आणि अव्वल सीडेड अर्मेनियाचा लेवॉन अरोनियन यांच्यातील लढतीची मोठी उत्सुकता होती. मात्र १९ मिनिटांतच दोघांनी प्रत्येकी अर्ध्या गुणावर समाधान मानले. सर्गेई कार्याकिनने चुरशीच्या लढतीत त्याचा देशबंधू पीटर स्विडलरवर मात केली.
आठव्या फेरीनंतर आनंद आणि अरोनियनचे प्रत्येकी पाच गुण झाले असून दोघेही संयुक्तरित्या अव्वल आहेत. शुक्रवारी पांढ-या मोह-यांनिशी खेळताना अरोनियनचे पारडे जड होते. शिवाय सातव्या फेरी त्याने रशियाचा सर्गेई कार्याकिनचा पराभव केला होता. मात्र अरोनियनने बचावात्मक खेळ केला. आनंदवर वरचढ होण्याची संधी गमावल्याने तो नक्कीच निराश झाला असणार. बरोबरीचे शुक्लकाष्ठ संपत नसले तरी आठ फे-यानंतर पराभव न पाहिलेला आनंद एकमेव बुद्धिबळपटू आहे. अन्य लढतीत बल्गेरियाचा व्हॅसेलिन टोपालोव आणि अझरबैजानचा शॉखरियार मामेद्यारोव यांच्यातील लढतही बरोबरीत सुटली. रशियाचा व्लादिमिर क्रॅमनिक आणि रशियाचा दिमित्री आंद्रेइकीननेही अर्ध्या गुणावर समाधान मानले. आंद्रेइकीनविरुद्ध क्रॅमनिकने दोनदा वरचढ होण्याची संधी गमावली. साडेचार गुणांसह क्रॅमनिक तिस-या स्थानी आहे.
नवव्या फेरीत आनंदची गाठ टोपालोवशी
नवव्या फेरीत रविवारी (२३ मार्च) आनंदची गाठ बल्गेरियाचा व्हॅसेलिन टोपालोवशी पडेल. अव्वल सीडेड अर्मेनियाचा लेवॉन अरोनियन हा अझरबैजानचा शॉखरियार मामेद्यारोवशी झुंजेल. अन्य लढतींमध्ये कार्याकिन वि. आंद्रेइकीन आणि स्विडलर वि. क्रॅमनिक हे अशा रशियन जोड्या आमनेसामने आहेत.