अंध, अपंग, कुष्ठरोगी ज्यांना त्यांच्याच घरी एकेकाळी मान नव्हता, सन्मान नव्हता अशांना मान मिळवून दिला, काम दिलं, जगण्याचा आधार दिला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी.
अंध, अपंग, कुष्ठरोगी ज्यांना त्यांच्याच घरी एकेकाळी मान नव्हता, सन्मान नव्हता अशांना मान मिळवून दिला, काम दिलं, जगण्याचा आधार दिला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी. आनंदवनच्या बांधवांनी तयार केलेल्या कित्येक वस्तू आपल्या घरी असतात. त्याचं वर्णन ‘आनंदवन आपल्या दारी’ अशा शब्दांत कुसुमाग्रजांनी केलं आहे. आता हेच ‘आनंदवन’ संगीताच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचा वसा संगीतकार-संगीतज्ञ अरविंद मुखेडकर यांनी घेतला आहे. त्यातूनच ‘आनंदवन आले घरी.. ’ या ऑडिओ सीडी अल्बमची निर्मिती झाली आहे. या ऑडिओ सीडीच्या निर्मितीचा प्रवास रंजक आहे.
आपल्या संगीत साधनेचा उपयोग गरजूंना मिळावा, या हेतूने अरविंद मुखेडकर यांनी ठिकठिकाणी संगीत शिबिरे घेण्यास सुरुवात केली. या शिबिरात अंध विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठी होती. मुखेडकरांचं असंच एक शिबिर बाबा आमटेंच्या ‘आनंदवन’मध्ये ‘स्वरानंदवन’साठी झालं. ‘आनंदवन’मधल्या अंध-अपंगांचे कलागुण, त्यांची संगीताची ओढ लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बाबा आमटेंनी ‘स्वरानंदवन’ नावाच्या संगीत नृत्याविष्काराची स्थापना केली.
‘स्वरानंदवन’च्या सहका-यांची सांगीतिक आवड मुखेडकरांच्या लक्षात आली. या मुलांना गुणवत्तेच्या टाळय़ा मिळवून देण्यासाठी तसंच स्टेज परफॉर्मन्स करणा-या मुलांना व्यावसायिक ध्वनिमुद्रणाचा ‘स्टुडिओ अनुभव मिळण्यासाठी काहीतरी निराळं करण्याचा प्रस्ताव आमटे कुटुंबीयांसमोर मांडला. आमटे कुटुंबीयांच्या अथक परिश्रमांतून तसंच ‘आनंदवन मित्रमंडळ, मुंबई’चे नरेंद्र मेस्त्री आणि ‘आनंदवन’च्या हितचिंतकांच्या प्रयत्नातून ‘आनंदवन आले घरी..’ या ऑडिओ सीडीची निर्मिती केली.
सीडीत एकूण आठ गाणी आहेत. विशेष म्हणजे यातील एका गीताची स्वररचना पु. ल. देशपांडे यांची असून, त्या गाण्यांचे शब्द ग. दि. माडगूळकरांनी लिहिले आहेत.
तीन गाणी ‘स्वरानंदवन’च्या गायकवृदांनी गायली आहेत. ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, आर्या आंबेकर, अरिहंत आणि डॉ. भारती आमटे यांनी गाणं गाऊन या सीडीच्या सांगीतिक मूल्यात भर घातली आहे. या गाण्यांचं निवेदन सचिन खेडेकर यांनी केलं आहे. या अनोख्या सीडीचं प्रकाशनच्या वेळी एकनाथ ठाकूर, केसरीभाऊ पाटील, निर्मिती सावंत, डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे आणि संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकारांची उपस्थिती असेल. ऑडिओ सीडीच्या अनावरण सोहळय़ात आर्या आंबेकर आणि रवींद्र साठे ‘आनंदवन आले घरी..’
मधील गाणी म्युझिक ट्रॅकवर सादर करतील. ‘त्यांना संधी द्या, दया नको’ हे बाबा आमटे यांनी ‘आनंदवन’च्या बांधवाबद्दल व्यक्त केलेलं एक महत्त्वाचं विधान आहे. त्या विधानाला स्मरून मुखेडकर ‘स्वरानंदवन’च्या कलाकारांना सहानुभूतीच्या नाहीत तर गुणवत्तेच्या टाळय़ा मिळवून देण्यासाठी तसंच त्यांना संगीतात सशक्त करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
स्थळ : दादर-माटुंगा क्लचरल सेंटर, १२२-अ, जे. के. सावंत मार्ग, बॉम्बे ग्लासवर्क समोर, यशवंत नाटय़मंदिर शेजारी, माहीम, मुंबई ४०००१६. वेळ : सकाळी १०.००
संतूरवादन
पंडित सतीश व्यास हे एक आघाडीचे संतूरवादक आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचे एक ज्येष्ठ शिष्य आहेत. आपल्या थक्क करणा-या अदाकारीने त्यांनी जगभरातील संगीतरसिकांना आणि आपल्या चाहत्यांना गेली अनेक र्वष मंत्रमुग्ध केलं आहे. जगाच्या कानाकोप-यात त्यांनी आपली कला सादर केली आहे. अशा पंडित व्यास यांच्या संतूरवादनाचा कार्यक्रम फाइन आर्ट्सतर्फे आयोजित केला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२१५८८९०९ / ९८१९७०९८८३
स्थळ : एस. एम. शेट्टी स्कूल, हिरानंदानी गार्डन्स, पवई वेळ : सायं. ६
शनिवार
संगीत मैफल
ख्याल ट्रस्टतर्फे एका संगीत मैफलीचं आयोजन होत आहे. यात ‘दिल्ली घराण्याच्या हजरत आमीर खुसरो यांचं संगीतातील योगदान’ या विषयावर दिल्ली घराण्याचेच उस्ताद इकबाल अहमद खान आपलं मत मांडतील. याशिवाय ख्याल, कव्वाली, क्वाल, नक्श, गुल आणि तराना आदी संगीत प्रकार सादर करतील. त्यांना निरंजन लेले (हार्मोनियम) आणि अनुतोष डेघरिया (तबला) साथसंगत करतील.
स्थळ : दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, स्टारसिटी सिनेमा, जे. के. सावंत रोड,
माटुंगा (प.)न वेळ : सायं. ५.३०