जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने गुरुवारी नॉर्वे बुद्धिबळ ओपन स्पर्धेच्या दुस-या फेरीत अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला बरोबरी मान्य करायला लावली.
सॅँड्स – जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने गुरुवारी नॉर्वे बुद्धिबळ ओपन स्पर्धेच्या दुस-या फेरीत अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला बरोबरी मान्य करायला लावली. आता हे दोघेही थेट नोव्हेंबरमध्ये होणा-या जगज्जेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येण्याची शक्यता असल्याने या डावाला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते.
आनंदने काळी मोहरी घेऊन खेळताना सिसिलियन डिफेन्स मॉस्को व्हेरिएशनचा अवलंब केला. गेल्या वेळेलाही कार्लसनने मॉस्को व्हेरिएशनवरच आनंदला नमवले होते. तरीही आनंदने या प्रकारात खेळून हिंमत आणि तयारी दाखवून दिली. पण २०व्या आणि २५व्या चालीला कमकुवत खेळी खेळून आनंदने दडपण ओढवून घेतले होते. मात्र त्याने कार्लसनलाही जिंकू दिले नाही. ५९व्या चालीत दोघांनी एकही प्यादे शिल्लक नसताना बरोबरी मान्य केली.
रशियाच्या सर्जी कार्याकिनने सलग दुसरा विजय नोंदवत दोन गुणांची भक्कम आघाडी घेतली. त्याने नॉर्वेच्या हॅमरला ५४व्या चालीत पराभव मान्य करायला लावला. आर्मेनियाच्या लेवॉन अरोनियननेही स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. त्याने अमेरिकेच्या हिकरू नाकामुराला ५१ चालींत नमवले. माजी जगज्जेता बल्गेरियाच्या वॅसेलिन टोपॅलोवला अझरबैजानच्या तैमूर राद्याबॉवविरुद्ध ४० चालींमध्ये बरोबरी मान्य करावी लागली.
रशियाच्या पीटर स्विडलरला मात्र चीनच्या वॅँग हाओकडून ६३ चालींत पराभव मान्य करावा लागला. आनंद, स्विडलर, नाकामुरा, कार्लसन, टोपालोव आणि वॅँग हाओ हे प्रत्येकी एका गुणासह संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत. अरोनियनला दीड गुणांसह दुसरे स्थान मिळाले आहे.